मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत माथाडी कामगार नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांच्या घरी भोजनाचा कार्यक्रम होता. त्यामुळे सर्व नेते नरेंद्र पाटील यांच्या घरी पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलेल्या एका प्रश्नावर उद्धव यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले. या उत्तरानंतर पाटील यांच्या घरी उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये एकच हशा पिकला.


सध्या राज्यभरात शिवसेना भाजप युतीची धोषणा कधी होणार? याचीच चर्चा सुरु आहे. सर्वांना त्याची उत्सुकता आहे. ही युती पितृपक्षामुळे रखडली असल्याची चर्चा आहे. या युतीच्या घोषणेवरुन मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांना एक प्रश्न विचारला होता. त्यावरील उद्धव यांचे उत्तर सरकॅझमची (sarcasm) उच्च पातळी गाठणारा असल्याचे बोलले जात आहे.

नरेंद्र पाटील यांच्या घरी जेवण झाल्यानंतर उद्धव ठाकरे हात धुवायला गेले. तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना गमतीनं विचारलं, 'उध्दवजी पितृपक्षाची काही अडचण नाही ना? त्यावर उद्धव ठाकरे यांनी मिश्कीलपणे उत्तर दिलं, "देवेंद्रजी मुळात आमचा पक्ष हा 'पितृ'पक्ष आहे" उद्धव यांचं हे उत्तर ऐकल्यानंतर जेवणाच्या हॉलमध्ये एकच हशा पिकला होता.

उद्धव ठाकरे यांच्या या उत्तराचे दोन अर्थ काढले जात आहेत. पहिला अर्थ म्हणजे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी स्थापन केला आहे. म्हणून उद्धव ठाकरे शिवसेनेला पितृपक्ष म्हणाले असावेत. तर दुसरा अर्थ म्हणजे शिवसेना-भाजपच्या युतीत शिवसेना हा पक्ष पित्यासमान आहे, असे उद्धव ठाकरे यांना सुचवायचे होते.

सध्या शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपाची जोरदार चर्चा सुरु आहे. एकावर एक फॉर्म्युले सांगितले जात आहेत, त्यात युतीची घोषणा पितृपक्षामुळे रखडल्याची चर्चा असताना उद्धव ठाकरेंनी हा विनोद केला.

येत्या निवडणुकीत युतीचंच सरकार येणार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण | ABP Majha



220 पेक्षाही जास्त जागा जिंकू, शिवसेनेसोबत युती होणार, चंद्रकांत पाटलांना विश्वास | ABP MAJHA