अहमदनगर: किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयावर आंदोलन करायचं की नाही याचा निर्णय रविवारी घेणार असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी अण्णांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली. त्यावर आपलं 50 टक्के समाधान झाल्याचं सांगत अण्णा हजारेंनी उपोषणासंबंधी रविवारी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं आहे. 


आज झालेल्या बैठकीनंतर अण्णांचं काही प्रमाणात समाधान करण्यात राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांना यश आल्याचं दिसून येतंय. नायर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपलं 50 टक्के समाधान झाल्याचं सांगत उपोषणाबाबत उद्या निर्णय घेणार असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे. सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी सरकारला उपोषणाचा इशारा दिला होता. 14 तारखेला अण्णा राळेगणसिद्धी येथे सरकारच्या विराधात उपोषण करणार होते. मात्र आजच्या भेटीनंतर उपोषणाबाबत उद्या निर्णय घेणार आहेत.


सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह निर्णय आणि अंमलबजावणीबाबत अण्णांना माहिती देण्यासाठी राळेगणसिद्धी येथे आल्या होत्या. सुमारे तीन तास वल्सा नायर सिंह यांनी अण्णांसोबत चर्चा केली. सरकारने वाईन विक्री संदर्भात निर्णय घेतला असला तरी अंमलबजावणी करण्यासाठी अनेक प्रक्रिया आहेत. यामध्ये मुख्यतः राज्यातून या निर्णयाबाबत असलेल्या हरकती जाणून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती वल्सा नायर सिंह यांनी अण्णांना दिली आहे.


जनतेच्या हरकती मागवणार
नव्या नियमावलीच्या नियमाचा प्रारूप आधी प्रसिद्ध केले जाईल. त्यावर जनतेच्या प्रतिक्रिया आणि हरकती मागवल्या जातील. त्यानंतरच या संदर्भातील अंतिम निर्णय होणार आहे.


किराणा दुकाणातून वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून या निर्णयाला विरोध होत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारच्या निर्णयावर कडाडून टीका केली होती. तर सरकारमधील अनेक मंत्र्यांनी वाईन ही दारू नसून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. परंतु, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने आपल्या निर्णयावर जनतेच्या प्रतिक्रिया मागवणार असल्याचे स्पष्ट केलं.


संबंधित बातम्या: