अहमदनगर : राळेगणसिद्धी... ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं गाव... त्याचबरोबर जलसंधारणाची पंढरी म्हणूनही या गावाची ओळख... आता राळेगणनं आणखी एक ओळख निर्माण केलीय... सौर उर्जेच्या माध्यमातून राळेगणसिद्धी स्वयंपूर्ण होतंय...


 
नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ, रस्त्यांच्या दुतर्फा हिरवीगर्द झाडी... मुबलक पाणी... जलसंधारणाची पंढरी मानलं जाणारं राळेगणसिद्धी हे गाव आता लवकरच सौरउर्जेवरील स्वयंपूर्ण गाव होणार आहे.

 

संपूर्ण गावाच्या आणि जलपुनर्भरण पाणी उपसा योजनेच्या विजेची गरज भागवण्यासाठी गावात सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहे.
राळेगणची पाण्याची गरज भागवण्यासाठी गावात तब्बल 40 बंधारे बांधण्यात आलेत. यातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी यादवबाबा जलपुनर्भरण योजना सुरु करण्यात आली.

 
या योजनेत शेवटच्या बंधाऱ्याजवळच्या विहिरीतून पाणी उपसून पुन्हा डोंगरमाथ्यावर सोडलं जातं. त्यामुळे तब्बल पाचशे एकर शेतीला फायदा होतोय. यासाठी एकूण साडे सहाशे अश्वशक्तीचं पंप असून वर्षाला तब्बल तीस लाखांपर्यंत वीज बील येतंय. ते वाचवण्यासाठी कुकडीच्या कॅनॉलवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहे.

 
गुजरातच्या नर्मदा नदीच्या पार्श्वभूमीवर हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आलाय. या कुकडीच्या कॅनॉलवर तब्बल अर्धा किलोमीटरवर सोलर प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे. तब्बल एक मेगावॉटचा हा प्रकल्प असेल. या प्रकल्पातून दिवसाला पाच हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे.

 
अर्धा किलोमीटरवर अडीचशे युनिटचे तब्बल चार हजार सोलर संच बसवण्यात येतील. यामुळे अर्धा किलोमीटर कॅनॉलवर सोलर संचाचं आच्छादन असेल. या प्रकल्पासाठी तब्बल आठ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. तीस टक्के निधी केंद्राकडून तर उर्वरीत निधी लोकप्रतिनिधी आणि सीएसआर फंडातून मिळणार आहे.

 

या उपक्रमानं गाव महावितरणमुक्त होऊन वर्षाला पन्नास लाखाचा फायदा होणार आहे. राळेगणमधील हा उपक्रम इतरही गावांनी जरुर राबवावा असं आवाहन अण्णा करतात. वीजनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो. त्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ते टाळण्यासाठी सौर ऊर्जेवरील वीजनिर्मिती हीच काळाची गरज असणाराय. ती ओळखून राळेगणसिद्धीनं प्रगतीच्या मार्गावर आणखी एक पाऊल टाकलंय.