Anna Bhau Sathe Birth Anniversary :  जाती व्यवस्थेच्या चटक्याने ज्यांना अवघ्या दीड दिवस शाळेत शिक्षण मिळाले. पण, आपल्या लेखणीतून कष्टकरी, सर्वाहारा, उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडणारे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे आजच्या दिवशी निधन झाले. अण्णाभाऊ 1932 साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईतील कम्युनिस्ट नेत्यांच्या नेतृत्त्वात सुरू असणाऱ्या चळवळीकडे अण्णाभाऊ आकर्षित झाले आणि पक्षाचे काम सुरू केले. कम्युनिस्ट पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ यांना शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहित केले. त्याच्या परिणामी अण्णाभाऊ यांनी शिक्षण घेतले. त्यातून त्यांनी आपल्या सभोवतालचे वास्तव आपल्या लेखणीतून मांडले. 


1942  च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर अटक वॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णांचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्टालिनग्राडचा पवाडा’ 1943 साली पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला. त्यांनी 1944 साली शाहीर अमर शेख आणि दत्ता गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना 1947 साली प्रसिद्ध झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. अण्णा भाऊ साठे यांनी पोवाड्यात छक्कड हा प्रकार रुजवला. 


अण्णा भाऊ साठे यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णाभाऊ  हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कॉम्रेड अमर शेख आणि लाल बावटा कलापथकाद्वारे त्यांनी प्रबोधनाचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. 


पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे, असे ऐतिहासिक वक्तव्य त्यांनी 1958 च्या दलित साहित्य संमेलनात काढले होते. मुंबईची लावणी, माझी मैना गावावर राहिली..आदी पोवाडे त्यांचे चांगलेच गाजले. 


इंडियन पीपल्स थिएटर अर्थात इप्टा या सांस्कृतिक संघटनेत अण्णा भाऊ साठे सक्रिय होते. या इप्टामध्ये बलराज सहानी आणि इतर अभिनेते सक्रीय होते. बलराज सहानी आणि अण्णा भाऊ साठे यांच्यात मैत्रीचे संबंध होते. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी (1960), चिरानगरची भुतं (1978), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह आहेत. तर, फकिरा (1959),  वारणेचा वाघ (1968), चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ (1963), वैजयंता ह्यांसारख्या 35 कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले आहे.  माझा रशियाचा प्रवास हे त्यांचे प्रवासवर्णन ही गाजले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या 7 कादंबऱ्यांवर चित्रपटांची निर्मिती झाली.