मुंबई : बीड प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा आहे, पण तो कोण घेणार यावरून टोलवाटोलवी सुरू असल्याचं समाजसेविका अंजली दमानिया यांनी म्हटलं. या प्रकरणी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं असंही दमानिया यांनी म्हटलं. धनंजय मुंडे यांच्याविरोधातील सर्व पुरावे दाखवण्यासाठी अजित पवारांची भेट घेतली, त्या भेटीत नेमकं काय झालं यावर बोलताना अंजली दमानिया यांनी अनेक गोष्टी समोर आणल्या. अंजली दमानिया या एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होत्या. 


अजित पवार चलबिचल झाले


अंजली दमानिया म्हणाल्या की,"बीड प्रकरणात आवाज उठवल्यानंतर अजित पवारांची भेट घ्यायची ठरवली. त्या आधी त्यांच्यावरच सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. मग कसे भेटायचे असा प्रश्न होता.  पण बीडचे प्रकरण गंभीर असल्याने त्यांना भेटायचं ठरवलं. त्यावेळी अजित पवारांच्या पीएला मेसेज केला. नंतर बैठक झाल्यानंतर अजित पवारांशी बोलणं झालं. सुरूवातीला ते काहीसे गांगरल्याचं दिसून आलं. त्यांना कदाचित समजत नसेल काय बोलायचं. मग त्यांनी रामटेकला भेटायला बोलावलं. पण नंतर म्हणाले, मी चुकून रामटेक बोललो, देवगिरीवर भेटायला या. यावरून त्यांची चलबिचल झाल्याचं लक्षात आली."


अजित पवारांना बीडचे सर्व व्हिडीओ दाखवले


अंजली दमानिया म्हणाल्या की, "अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी बोलायला सुरूवात केली. या जन्मी मी तुम्हाला भेटेन असं कधीही वाटलं नव्हतं असं त्यांना म्हटल्यानंतर ते काहीसे हसले. आताच्या घडीला जे दिसतंय ती परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली.  बंदुकांचे लायसन्स, गावठी कट्टे, अनेक रील्स होते. कराडची 3333 वाली गँग आणि असे अनेक व्हिडीओ दाखवले. महाराष्ट्राची पुढची दिशा अशी असणार का असं त्यांना विचारलं."


मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे


त्या भेटीवेळी अजित पवारांना तीन संदर्भ दाखवले आणि त्यावरून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केल्याचं दमानिया यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या की, "लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951, राज्यघटना कलम 102 आणि 191 कायदे दाखवले. त्यामध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नियमाच्या आधारे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा एक आदेश दाखवला. मंत्रिपदाची शपथ घेताना सरकारी कोणताही आर्थिक नफा घेत नाही असं प्रत्येक मंत्र्याने लेखी देण्याचा आदेश आहे. पण महाजेनकोकडून धनंजय मुंडेंना थेट लाभ मिळतो. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं अजित पवारांच्या निदर्शनास आणलं."


मुख्यमंत्र्यांना भेटून निर्णय घेण्याचं आश्वासन


अजित पवारांना सर्व पुरावे दाखवल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून निर्णय घेतो असं सांगितलं. पण मुंडे हे त्यांच्या पक्षाचे नाहीत त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेऊ शकत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं त्यांना सांगितलं. त्यावरही त्यांनी एकत्रित बसून निर्णय घेतो असं सांगितलं. 


मुख्यमंत्री म्हणाले अजित पवार निर्णय घेतील आणि अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री घेतील. त्यामुळे दोघांना राजीनामा तर घ्यायचा आहे पण कोण घ्यायचं यावर टोलवाटोलवी सुरू आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या.