मुंबई: मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याविरोधात शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांनी विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण प्रकरणामध्ये उदय सामंत यांनी सभागृहाला खोटी माहिती दिल्याचं सांगत अनिल परब यांनी हा हक्कभंग प्रस्ताव मांडला. काँक्रिटीकरणाच्या कामाला उशीर झाला म्हणून कंपनीला दंड केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली होती. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच झालं नसल्याचा दावा अनिल परब यांनी केला.
सभागृहाची फसवणूक केली म्हणून सभागृहात विरोधी पक्षातील नेत्यांनी उभे राहून तालिका सभापती मनीषा कायंदे यांच्याकडे उदय सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली. उदय सामंत यांनी मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण प्रकरणात कामाला उशीर केला म्हणून रोडवेज सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर 64 कोटी रुपयांचा दंड केल्याची माहिती दिली होती. मात्र प्रत्यक्षात असं काही झालंच नाही, त्यामुळे उदय सामंत यांनी सभागृहाला खोटी माहिती दिल्याचा आरोप अनिल परब यांनी केला.
जाता जाता हे राज्याला उद्ध्वस्त करणार
अनिल परब म्हणाले की, जर सरकार कुठे चुकत असेल तर त्याला आपली चूक दाखवून देणं, आरसा दाखवणं, सरकारला सत्तेचा माज आला असेल तर ते त्यांना दाखवून देणं हे विरोधकाचं काम असतं. हे या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे. शत्रूला वाटतं आपण हरतो तेव्हा संपूर्ण राज्य उद्ध्वस्त करून टाकायचं अशी स्थिती या सरकारची आहे.
जे प्रकल्प मंजूर झाले आहेत, ते वर्क ऑर्डर देऊन टाकायचं आणि त्यातून कमिशन घेऊन हेच पैसे उद्या निवडणुकीला वापरले जाणार आहेत. समृद्धीने भ्रष्टाचाराचा, गद्दारीचा, फुटीचा मार्ग दाखवला असा आरोप अनिल परब यांनी केला.
वाढीव किमतीने टेंडर दिले
भ्रष्टाचारासाठी वाढीव किमतीने टेंडर दिले असा आरोप करत अनिल परब म्हणाले की, ज्या ज्या गोष्टीचे टेंडर काढण्यात आलं त्यामध्ये वाढीव किंमत लावण्यात आला आणि वरचा पैसा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. पुणे रिंग रोडचं काम ब्लॅक लिस्ट केलेल्या कंपनीला देण्यात आलं आहे. चार टेंडरमध्ये 50 हजार कोटींचे काम हे 90 हजार कोटींना देण्यात आली आहेत. या टेंडरला मान्यता देण्यात आली नाही.
रोहित पवार यांनी एका अधिकाऱ्याच्या तीनप्रॉपर्टीची माहिती बाहेर काढली. आता इन्फ्रास्ट्रॅक्चरचा प्रमुख कोण आहे याची उत्तरात आम्हाला अपेक्षा आहे. उत्तरात या सगळ्या गोष्टी नाही आल्या तर आम्ही परत उठू. हा भ्रष्टाचार निवडणुकीसाठी फंड गोळा करण्यासाठी करण्यात आला आहे असा आरोप अनिल परब यांनी केला.
सोन्याच्या विटा लावता का तुम्ही?
राज्य सरकराच्या धोरणावर आरोप करत अनिल परब म्हणाले की, नॅशनल हायवे कोरपोरेशन ज्यात पैशात काम करते त्याच्यापेक्षा डबल रेट्स तुम्ही कसे लावता? सोन्याच्या विटा लावता का तुम्ही? कालच्या एका लक्षवेधीमध्ये उदय सामंत यांनी रोडवेज सोल्यूयुशन प्रायव्हेट लिमिटेडकडून पैसे वसुल केले अशी माहिती सभागृहाला दिली. पण त्यापैकी एक पैसाही घेतला नाही किंवा कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं नाही.
ही बातमी वाचा: