Anil Deshmukh on Devendra Fadnavis : बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या घृणास्पद प्रकारानंतर अवघा महाराष्ट्र संतापला आहे. देश पातळीवरही पडसाद उमटत आहेत. दरम्यान, बदलापूर घटनेनंतर दोन दिवस होऊनही गृहमंत्री कुठे गायब आहेत? अशी विचारणा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी ट्विट करत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. 


महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहेत?


देशमुख यांनी ट्विट करत म्हटले आहे की, दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहेत? बदलापूर येथे इतकी संवेदनशील घटना घडली, त्यावर गृहमंत्री  उत्तरे कधी देणार आहेत! बदलापूरमध्ये चिमुरडींवर घडलेल्या घटनेनंतर  20 ऑगस्ट रोजी बदलापूर येथील लोकल ट्रेनच्या रेल्वे ट्रॅकवर हजारोंचा जमाव उतरला होता. 12 तास आंदोलन करताना तोडफोड आणि पोलिसांवर दगडफेक झाली. 


महाराष्ट्र बंदची घोषणा


पोलिसांनी 300 आंदोलकांवर एफआयआर नोंदवला असून आतापर्यंत 72 जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, या प्रकरणाच्या तपासासाठी आयजी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात होणार असून सरकारी वकील उज्ज्वल निकम हे असतील. आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीने (MVA) 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.


पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही


ही घटना 12 आणि 13 ऑगस्ट रोजी घडली. आदर्श शाळेतील 23 वर्षीय सफाई कामगार अक्षय शिंदेनं दोन्ही मुलींचे लैंगिक शोषण केले. यानंतर दोन्ही मुली शाळेत जाण्यास घाबरू लागल्या. पालकांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. एका पालकाने त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तपासणी केली असता खरी घटना समोर आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉक्सो प्रकरण असूनही एफआयआर नोंदवण्यास विलंब केला होता. 


मुलीच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बदलापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दोन दिवसांनी शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 17 ऑगस्ट रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपी अक्षयची १ ऑगस्ट रोजी शाळेतच कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती. पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासाठी 12 तासांपेक्षा जास्त वेळ घेतल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. सुरुवातीला पोलीस तक्रारही ऐकत नव्हते.


राहुल गांधी म्हणाले, एफआयआरसाठीही आंदोलन करावे लागेल का?


राहुल गांधींनी बुधवारी सोशल मीडियावर लिहिले की, पश्चिम बंगाल, यूपी, बिहारनंतर महाराष्ट्रातही मुलींवरील लाजिरवाण्या गुन्ह्यांमुळे समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? बदलापुरात दोन निरपराधांवर घडलेल्या गुन्ह्य़ानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिले पाऊल उचलले नाही तोपर्यंत जनता 'न्यायासाठी याचना' करत रस्त्यावर उतरली आहे. आता एफआयआर नोंदवण्यासाठी आंदोलन करावे लागेल का? अखेर पीडितांना पोलीस ठाण्यात जाणेही अवघड का झाले आहे?


न्याय मिळवून देण्यापेक्षा गुन्हे लपविण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातात, ज्याचा सर्वात मोठा बळी महिला आणि दुर्बल घटकातील लोक आहेत. एफआयआर न नोंदवल्याने पीडितांना निराश तर होतेच पण गुन्हेगारांना धीरही मिळतो. समाजातील महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत, याचा सर्व सरकार, नागरिक आणि राजकीय पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागेल. न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तो पोलिस आणि प्रशासनाच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही.


इतर महत्वाच्या बातम्या