Badlapur School Crime Case : बदलापूर : दोन चिमुकल्यांना ओरबाडणाऱ्या बदलापूरमधल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी संपूर्ण राज्यभरातून केली जात आहे. आरोपीला फाशी द्या, अशीच मागणी करत अख्खं बदलापूर मंगळवारी रस्त्यावर उतरलं होतं. याप्रकरणाचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटले होते. अशातच आता या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, 24 वर्षीय आरोपी अक्षय शिंदेची तीन लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अक्षयच्या तिन्ही बायका त्याला सोडून गेल्याचंही समोर आलं होतं. पण आता याप्रकरणी एक नवा ट्वीस्ट आलाय, एबीपी माझानं अक्षय शिंदेच्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी आरोपीच्या आई-वडिलांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. 


बदलापूर (Badlapur Crime) प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचे आई-वडील आणि लहान भावाशी कॉलद्वारे संपर्क साधला असता, या तिघांनी अक्षय निर्दोष असल्याचं सांगितलं आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणात अक्षयला फसवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. एवढंच नाहीतर, 17 तारखेच्या अटकेनंतर अक्षयला स्थानिकांकडून मारहाण झाल्याचा आरोपही त्याच्या कुटुंबानं केला आहे. 


तीन लग्न झालीत, ही गोष्ट खोटी; आरोपीच्या आई-वडिलांचा दावा


एबीपी माझाशी बोलताना आरोपी अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी सांगितलं की, "अक्षयची तीन लग्न झालीत, ही गोष्ट खोटी आहे. अक्षयला कामाला लागून आता फक्त पंधरा दिवस झाले आहेत. 13 तारखेला या प्रकरणाबाबत आम्हाला माहिती मिळाली. अक्षयला 17 तारखेला पकडून घेऊन गेले. पण याबाबत आम्हाला काहीच सांगितलं नाही. शाळेत काम करणाऱ्या एका बाईनं आम्हाला सांगितलं की, अक्षयला धरून नेलं. मला कळाल्यानंतर मी तिथे आले, तर पोलीस अक्षयला मारत होते. त्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात गेलो, त्यावेळी पोलिसांनी सांगितलं की, तुमच्या पोरानं बारक्या मुलींसोबत असं असं केलंय. अक्षयकडे फक्त 11 वाजता शाळेतलं बाथरूम धुवायचं काम होतं. दुसरं काहीच काम त्याच्याकडे नव्हतं. आमचं सर्व कुटुंब शाळेत काम करायचं. शाळेत झाडू मारण्याचंही काम आमच्याकडे होतं. संध्याकाळी शाळा सुटल्यावर आम्ही शाळेत जायचो आणि काम आटपून घरी परतायचो. अक्षय पहिल्यापासून डोक्यामध्ये जरा कमजोरच होता, त्याला गोळ्या-औषधं सुरू होती." 


बदलापूर प्रकरणाची हायकोर्टाकडून दखल, सुमोटो याचिका दाखल 


बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी आज तातडीची सुनावणी होणार आहे. बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेची चौकशी मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीकडून करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढं ही सुनावणी होणार आहे. 


26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपी अक्षय शिंदेंचं वकीलपत्र स्वीकारायला कल्याणमधील वकिलांच्या संघटनेन नकार दिला आहे. अक्षय शिंदेंसारखे नराधम कधीच तुरुंगाबाहेर येऊ नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचं वकिलांच्या संघटनेनं म्हटलं आहे.


कोण आहे नराधम अक्षय शिंदे?



  • अक्षय शिंदेचे वय 24 वर्षे

  • अक्षयचे शिक्षण दहवीपर्यंत 

  • अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई 

  • या आधी अक्षय एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता 

  • एका कंत्राटामार्फत आदर्श शाळेत शिपाई म्हणून लागला 

  • अक्षय,आई-वडील आणि त्याचा भाऊ आणि भावाची बायको असे त्याचे कुटुंब 

  • अक्षयची तीन लग्न झाली होती मात्र तिनही बायका सोडून गेल्या होत्या 

  • अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील

  •  मात्र अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात 


पाहा व्हिडीओ : Badlapur Case : आरोपी अक्षय शिंदेच्या आई वडिलांचा खळबळजनक आरोप; बदलापूर अत्याचार प्रकरणात ट्विस्ट