Anil Deshmukh : गेल्या काही दिवसांपासून संपर्कात नसलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर राहिले. ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यापूर्वी ट्वीट करत अनिल देशमुख यांनी आपली बाजू सविस्तर मांडली. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं. 


मला ज्यावेळी ईडीचा समन्स आला. तेव्हा मी ईडीला चौकशीत सहकार्य करत नसल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. पण जेव्हा जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा तेव्हा त्यांना सहकार्य केलेय. त्यांना प्रत्येकवेळा सांगितलं की माझी याचिका हायकोर्टात आहे. त्याची सुनावणी सुरु आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडीच्या कार्यालयात येईल. ईडीने जेव्हा माझ्या घरी छापे टाकले तेव्हा आमच्याकडून पूर्ण सहकार्य करण्यात आलं. सीबीआयचे दोन वेळा समन्स आले होते. त्या दोन्हीवेळा सीबीआय कार्यालयात जात सहकार्य केलं, असे अनिल देशमुख म्हणाले. 


अद्यापही माझी केस सुप्रिम कोर्टात सुरु आहे. पण आज मी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहिलोय. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. ज्या परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले, ते आज कुठे आहेत? प्रसारमाध्यमांत येणाऱ्या बातम्यानुसार, परमबीर सिंह भारत सोडून पळून गेले आहेत. आरोप करणाराच पळून गेलाय. परमबीर सिंह यांच्याविरोधात अनेक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच सचिन वाझे यांनीही परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर आरोप केले आहेत. सचिन वाझे आज खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. याआधीही तो तुरुंगात होता. मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला नोकरीवरुन काढण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या आरोपावर माझी चौकशी केली जातेय. माझ्या परिवाराला त्रास दिला जातोय. त्याबद्दल मला अतिशय दु:ख आहे, असे देशमुख म्हणाले. 


आणखी वाचा:


Anil Deshmukh At Ed Office : माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात


अनिल देशमुख यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यावाचून पर्याय नव्हता : प्रविण दरेकर