Pravin Darekar on Anil Deshmukh : अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज, सोमवारी ईडी कार्यालयात हजेरी लावली. यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'तपास यंत्रणापासून दूर जाता येत नाही. पाच-पाच समन्स दिल्यानंतरसुद्धा अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. हायकोर्टात, सुप्रिम कोर्टात दिलासा मिळेल असा त्यांचा प्रयत्न होता. कारवाईला स्थगिती मिळेल, असं त्यांना वाटत होतं. पण कोणत्याच कोर्टानं त्यांना स्थगिती दिली नाही. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. त्यांना आज ईडीसमोर हजर राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालेय की, माणूस कितीही मोठा असला तरी कायद्याचं पालन करत यंत्रणासमोर जावेच लागते.'
पाच समन्स दिल्यानंतरही ईडीच्या कारवाईला रिस्पॉन्स करत नसतील, तर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्यामुळे अलिकडील काळात ईडीचीही मस्करी करायला लागले. पण शेवटी तपास यंत्रणेनं दाखवून दिलं की कायद्यापेक्षा यंत्रणेपेक्षा कुणीही मोठं नाही. न्यायालयातही प्रयत्न करण्यात आले, पण दिलासा मिळाला नाही. शेवटी कायद्यासमोर झुकावं लागलं, असे प्रविण दरेकर म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरलेय. घोषणा झाली पण शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही. 30 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, याबद्दल कुठेही भाष्य नाही. कुठलीही कारवाई नाही. मग अशावेळी भाजप, केंद्र सरकारवर आरोप करत आपलं अपयश झाकलं जातेय. महाविकास आघाडी सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम दिसतोय, असा टोला यावेळी प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावलाय.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात
गेल्या बऱ्याच काळापासून नॉट रिचेबल असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नव्हते. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती. अशातच आज अनिल देशमुख स्वतः ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, "मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार आहे.