Anil Deshmukh At Ed Office : गेल्या बऱ्याच काळापासून नॉट रिचेबल असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नव्हते. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती. अशातच आज अनिल देशमुख स्वतः ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, "मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार आहे."
वारंवार समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख गैरहजर
अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना ईडीकडून वारंवार समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.
पाचही वेळा अनिल देशमुख यांनी आपल्या वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवून हजर होण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र अनिल देशमुख कधीच ईडीपुढे चौकशीला हजर झाले नाही. त्यातच ईडीनं त्यांच्यावरील कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले, तर अनिल देशमुख यांची साडेचार कोटींची संपत्ती जप्त केली. अनिल देशमुख असं म्हणाले होते की, कोर्टाचा निकाल आल्यानंतर ते ईडीसमोर हजर होतील. मात्र कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली, पण त्यांनतरही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत.
परमबीर सिंह बेल्जियममध्ये?
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांना शोधण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही. मात्र परमबीर सिंह बेल्जियममध्ये पोहोचलेत का असा सवाल आता विचारला जातोय. सवाल विचारण्यामागचं कारण म्हणजे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलेलं ट्वीट. 'परमबीर सिंह बेल्जियममध्ये पोहचलेच कसे? असा प्रश्न निरुपम यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.
संजय निरुपम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मंत्र्यावर हप्ता वसुलीचे आरोप लावले. ते स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी सांगितलं आहे की ते फरार आहेत. आता ते बेल्जियममध्ये असल्याची माहिती समोर येतेय. त्यांना तिथेपर्यंत कोणी पोहोचवलं. त्यांना आपण परत आणू शकत नाही का?"