मुंबई: अंधेरी पोटनिवडणुकीतून (Andheri East Bypoll 2022) भाजपने आपला उमेदवार माघार घेतल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पत्राच्या माध्यमातून आभार मानले आहेत. आपल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून उमेदवार माघार घेतल्याबद्दल आपले आभार असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्याविरोधातील भाजपचा उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली होती.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्या जागेसाठी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. रमेश लटके यांची राजकीय वाटचाल लक्षात घेता, त्यांचं काम लक्षात घेता त्या अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपने उमेदवारी देऊ नये अशी विनंती राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली होती. त्यानंतर आज भाजपने आपला उमेदवार या ठिकाणाहून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार.
चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची विनंती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे मत व्यक्त केले होते. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. भाजप उमेदवार मागे घेणार का, याबाबत पक्षाचे नेतृत्व निर्णय घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.