Andheri East Bypoll: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने (Announce Withdraw Candidate From Andheri East Bypoll) केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपकडून याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आज बैठकीनंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी इतर उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होण्याची शक्यता आहे.
पोटनिवडणुकीतून उमेदवार माघार घेण्याबाबत दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, अमित साटम, राजहंस सिंह, कृपाशंकर सिंह, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्याआधी रविवारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्यासाठी ठाम होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर आज भाजपकडून आज झालेल्या बैठकीत माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या पोटनिवडणुकीत विजयी होतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.
उमेदवार माघारीसाठी पत्र
रविवारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची विनंती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे मत व्यक्त केले होते. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. भाजप उमेदवार मागे घेणार का, याबाबत पक्षाचे नेतृत्व निर्णय घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
तरीही निवडणूक होणार
भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली. त्यानंतरही अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटात मुख्य लढत होती. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपशिवाय, इतर बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये अपक्षांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता अपक्ष आणि नोंदणीकृत नसलेले पक्ष कोणती भूमिका घेणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.