Chhatrapati Sambhaji Nagar : राज्याचे रोहयो मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या घरावर आज अचानक वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) मोर्चा धडकला. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलकांना अडवत ताब्यात घेतले. भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात अतिक्रमण काढल्याने बेघर झालेल्या 64 कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. 


आज दुपारच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संदिपान भुमरे यांच्या गारखेडा परिसरात असलेल्या सूतगिरणी येथील निवासस्थानावर धडक मोर्चा काढला. यावेळी मोठ्याप्रमाणावर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि घर पाडण्यात आलेले अतिक्रमणधारक उपस्थित होते. ज्यात महिलांची देखील संख्या पाहायला मिळाली. दरम्यान यावेळी पुंडलिकनगर आणि जवाहरनगर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यातच अडवत पुढे जाऊ दिले नाहीत. तर यावेळी आंदोलकांचे निवदेन संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. 


काय म्हटले आहे निवदेनात? 


पैठण येथील गट नं. 6 व 7 मध्ये किमान 64 कुटुंब मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून राहत होती. हे अतिक्रमण काढण्याकरीता स्थगिती मिळाली होती. याबाबत तेथील रहिवाशी गेल्या 13 वर्षापासुन शासन दरबारी पाठपुरावे करत होती. त्यासाठी त्यांनी उपोषण आंदोलने, मोर्चे केलेली आहेत. मात्र तेथील रहिवाशांची घरे उध्वस्त करून त्यांना शासनाने बेघर करून उघडयावर पाडले आहे. आज घडीला हे सर्व कुटुंब दरबदर भटकंती करत आहे. त्यामुळे या 64 कुटुंबांना शासकीय जागेवर पुनर्वसन करून राहण्याकरीता घर जागा दयावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 


पोलिसांचा मोठा बंदोबस्त... 


पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या गारखेडा परिसरातील घरावर मोर्चा काढला जाणार असल्याचे निवदेन आधीच देण्यात आले होते. त्यामुळे या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून भुमरे यांच्या निवासस्थानी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान आज दुपारच्या सुमारास अखेर मोर्चा भुमरे यांच्या घराच्या दिशेने निघाला. मात्र आधीच तैनात असलेल्या पोलिसांनी मोर्चा अडवला. यावेळो दोन पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आंदोलकांचे निवदेन घेऊन, याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर आंदोलकांना  अडवण्याचा प्रयत्न करताना पोलीस आणि मोर्चेकरी यांच्यात झटापट देखील झाल्याचे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : मोठमोठे लोक ईडी-सीबीआयच्या फेऱ्यात अडकले, तुमचाही नंबर लागू शकतो; सत्तारांचा अधिकाऱ्यांना इशारा