Sharad Pawar In Ahmednagar : अहमदनगरच्या (Ahmednagar) हमाल मापडीच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सत्तेचा उपयोग लोकांच्या हितासाठी न करता जातीजातींमध्ये वाद घडवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. लोकहितापेक्षा वाद निर्माण केले जात असल्याचे देखील पवार म्हणाले.
दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये दोन-तीन दिवसापासून बाजारपेठ बंद होती. या ठिकाणी जातीजातींमध्ये अंतर निर्माण करण्याचं काम असो किंवा जाती जातीत संघर्ष निर्माण करण्याचे काम कोणत्या तरी अदृष्य शक्ती करत आहे. तर अहमदनगर जिल्ह्याची पुरोगामी जिल्हा म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले आहे. पण त्याच अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावला दोन ते तीन दिवस बाजारपेठ बंद होती. त्यामुळे जातीजातींमध्ये वाद घडवणाऱ्या शक्तीला विरोध करण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. असं केलं नाही तर सर्वसामान्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.
समाजातील चित्र बदलत आहे, कर्नाटकमध्ये एक नवं राज्य आलं आहे. तिथं धनगर समाजाचा मुख्यमंत्री झाला. हे केवळ शक्य झालं ते कष्टकऱ्यांच्या एकजुटीमुळे. कर्नाटकमध्ये ही एकजूट होऊ शकते तर देशातील इतर राज्यात का नाही असंही शरद पवार म्हणाले. अहमदनगर येथे हमाल मापडी महासंघाच्या अधिवेशनात ते बोलत होते.
माणसांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचं कर्नाटकात पराभव...
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आता देशातील चित्र बदलत असून, काल मी बंगळुरूमध्ये होतो. तिथं नवीन सरकार आलं आहे. तिथं गेली काही वर्ष काही लोकांचं राज्य होतं. पण सत्तेत असलेल्या त्या लोकांनी त्यांच्या सरकारच्या काळात माणसांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केले होते. तर कर्नाटकची निवडणूक सत्ताधारी भाजपा जिंकणार असल्याचे सर्व देशाला वाटत होते. पण तिथे सामान्य माणसाचं सरकार सत्तेत आलं आणि काल शपथविधी झाला. या शपथविधी सोहळ्यासाठी एक लाखापेक्षा अधिक लोक हजर होते. विशेष म्हणजे उपस्थित लोकांपैकी 70 टक्के तरुण होते आणि सर्व जातीजमातीमधील होते, असेही शरद पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: