Anandacha Shidha News: राज्यात गरीबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिंदे सरकारने (CM Eknath shinde) आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) वाटप सुरू केली आहे. मात्र हा आनंदाचा शिधा सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी वादात सापडला आहे. राज्यात काही ठिकाणी आनंदाच्या शिध्यातून तेल गायब झाल्याचं समोर आलं होतं. आता आनंदाच्या शिध्यामधून साखरच गायब झाली आहे. शिवाय आनंदाचा शिधा वाटप करताना लाभार्थ्यांकडून मात्र पैसे पूर्ण घेण्यात येत असल्याने लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा संपूर्ण राज्यात वाटप करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी हा शिधा पोहोचलेलाच नसून यामुळे लाखो लाभार्थ्यांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही. तुळशी विवाहापर्यंत दिवाळी असते तोपर्यंत हा शिधा पोहोचेल असं अजब वक्तव्य आज मंत्री दीपक केसरकर यांनी केल्यानंतर धुळे शहरात मात्र एक नवीनच प्रकार याबाबत समोर आला आहे.


आनंदाचा शिधा घेण्यासाठी लाभार्थ्यांकडून पूर्ण पैसे घेतले जात आहेत. मात्र चार वस्तूंपैकी फक्त तीनच वस्तू लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत यातील साखर मात्र अद्याप लाभार्थ्यांना मिळालेली नाही, यामुळे दिवाळी गोड करणारा 'आनंदाचा शिधा'मधून साखरच गायब झाल्याने लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. साखर घेण्यासाठी परत पुढील काही दिवस लाभार्थ्यांना वाट बघावी लागणार आहे.


अनेक ठिकाणी सुरुवातीपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन दुकानांमधून वस्तू मिळण्यास विलंब होत आहे. काही कार्डधारकांना दिवाळीचा आनंदाचा शिधा मिळाला आहे, तर काहींना तांत्रिक अडचणीमुळे अद्यापही आनंदाचा शिधा मिळू शकलेला नाही. त्यात औरंगाबादमध्ये काही ठिकाणी शिध्यातून तेल पाऊच गायब असल्याचं समोर आलं होतं. त्यासाठी आकारले जाणारे पैसे मात्र तेवढेच घेतले जात असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. 


आधीच कोरोनामुळे दोन वर्षे दिवाळी साजरी करता आली नाही. त्यातच अजूनही अनेकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाल्याने ते देखील संकटात सापडले आहे. त्यामुळे अशात सरकारने घोषणा केलेल्या 'आनंदाचा शिधा' वाटपाच्या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र 'आनंदाचा शिध्या'तून कधी तेल गायब तर कधी साखर गायब होत असल्यानं नागरिकांना अतिरिक्त पैशांचा भुर्दंड लागत आहे.  


ही बातमी देखील वाचा - Anandacha Shidha: 'आनंदाचा शिधा'तून तेल गायब, शंभर रुपयांची कीट पडतेय दोनशेला