Anaganewadi Yatra  2022 : गेल्या वर्षी कोरोनामुळे कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा मर्यादित स्वरुपात आणि साधेपणाने साजरी करण्यात आली होती. मात्र यंदा मोठ्या उत्साहात कोरोनाचे नियम पाळून आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा उद्या होणार आहे. प्रशासनाने यासंदर्भात नियोजन केले असून दोन डोस घेतलेल्यांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच एका वेळी ५० व्यक्तींना अश्या पद्धतीने दर्शन देण्याच्या सूचना प्रशासनाने आंगणे कुटुंबियांना दिल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे देवीची यात्रा गाव मर्यादित झाली होती. यंदा मात्र निर्बंधात सूट मिळाल्यामुळे पाच लाख भाविक दाखल होतील असा अंदाज आहे.


आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला जाणार असाल तर तुम्हाला सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळावे लागणार आहेत. दुकानदार व व्यापाऱ्यांच्या संख्येवर ही मर्यादा घातल्या गेल्या आहेत. मात्र मोठ्या संख्येने व्यापारी आंगणेवाडीत दाखल झाले आहेत. केवळ ओटी नारळ, मिठाई आणि पाणी अश्या काही मर्यादित स्वरूपाच्या दुकानाना परवानगी दिली होती. प्रचंड गर्दीची यात्रा म्हणून आंगणेवाडीची ही यात्रा प्रसिद्ध आहे.


अशी ठरते यात्रेची तारीख


कोकणात जत्रा म्हटलं की उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. कोकणातील गावागावात वर्षाच्या ठराविक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र भराडी देवीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही, कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरवण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे. दिवाळीत शेतीची कामं झाली की आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर बसतात. यालाच डाळप स्वारी म्हणतात. देवीला कौल लावला जातो. कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित केला जातो. एकदा निश्चित झालेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही हे सुद्धा आंगणेवाडी यात्रेचे वैशिष्ट्य आहे.


कोकणातील मोठी यात्रा


कोकणातील सर्वात मोठी यात्रा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील मसुरे गावच्या आंगणेवाडीची यात्रा. यात्रेच्या तारीखेनुसार मुंबईसह देशभरात पसरलेले भराडी देवीचे भक्त यातेला येत असतात. कोकणासह मुंबईतील सर्वच पक्षाचे नेते भराडीमातेच्या दर्शनासाठी आवर्जुन येत असतात. त्यामुळेच या यात्रेत सर्वच राजकीय लोकांचा भरणा असतो.