परीक्षेच्या निकालात तफावत
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे पुन्हा एकदा शिक्षण विभागाचे धिंडवडे निघाले आहेत. शिवाय शिक्षक भरती संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यासाठी गेल्या वर्षी 12 ते 21 डिसेंबर दरम्यान अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणी झाली.
या परीक्षेसाठी तब्बल एक लाख 97 हजार 520 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 लाख 71 हजार 348 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यानंतर राज्य सरकारने या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जानेवारी महिन्यात जाहीर केला. मात्र, या निकालात आणि परीक्षा झाल्यावर दाखवलेल्या गुणांमध्ये एक ते 30 गुणांपर्यत तफावत होती. याबाबतचे आक्षेप देखील विद्यार्थ्यांनी नोंदवले होते. त्यातच आता एक क्लिप व्हायरल झाली आहे.
काय आहे ऑडिओ क्लिप?
या टोळीला शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्याचं ऑडिओ क्लिपमधील संभाषणावरुन स्पष्ट होत आहे. यामध्ये सात लाख रुपये गुण वाढीचं काम करण्यासाठी आणि गुण वाढल्यानंतर सात लाख रुपये देण्याचं संभाषण आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे आमदार तुषार राठोड, शिक्षण सचिव नंदकुमार, परीक्षा परिषद आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह अन्य नावे आहेत. 2010 सालच्या भरतीतही गुण वाढवण्याचं संभाषण आहे.
या संभाषणामुळे परीक्षार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. शिवाय निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी शिक्षक भरतीसाठी आंदोलनं करण्याऱ्या संघटना आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.
शिक्षकांवर उद्याच्या उज्ज्वल भविष्याची निर्मिती करण्याची जबाबदारी असते. मात्र, शिक्षकांच्या भरतीमध्ये असा भ्रष्टाचार होत असेल तर उद्याची पिढीचं भविष्य कसं असेल, याबाबत वेगळं सांगायला नको. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा छडा लावून कष्टाने, मेहनतीने शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिप :