अहमदनगर : केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील संशयित प्रमुख सूत्रधार काँग्रेसचा नवनिर्वाचित नगरसेवक विशाल कोतकरला अटक करण्यात आली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव परिसरातून पहाटे त्याला अटक करण्यात आली.

मुख्य मारेकरी संदीप गुंजाळने विशाल कोतकरच्या सांगण्यावरुन हे हत्याकांड झाल्याचं तपासात सांगितलं होतं. त्यानंतर विशाल कोतकरचा शोध सुरु होता. अखेर विशाल कोतकरला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.

या हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापसह आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आलेली आहे.

काय आहे प्रकरण?

बिहारलाही लाजवेल असा प्रकार अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले.

या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली होती. शनिवारी 7 एप्रिलला हे हत्याकांड झालं. त्यानंतर जसे नावं समोर येतील, त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केली.

एसपी कार्यालयातील तोडफोड प्रकरणी गुन्हे

भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिजीत कळमकर, आमदार संग्राम जगताप यांचे भाऊ, झेडपी सदस्य सचिन जगताप, नगरसेवक कैलास गिरवले यांच्यासह चार नगरसेवक आणि अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर एसपी कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील अनेकांना अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

अहमदनगर हत्याकांड : 600 शिवसैनिकांवर गुन्हे

UPSC ते शिवसैनिकांच्या हत्येचा आरोपी - संदीप गुंजाळ

शिवसैनिकांची हत्या : राष्ट्रवादीच्या बदनामीचं षडयंत्र : अजित पवार

शिवसैनिकांची हत्या: भाजप आमदार शिवाजी कर्डिले अटकेत

नगरमध्ये तणाव, पालकमंत्री राम शिंदे थीम पार्कच्या उद्घाटनाला

शिवसैनिकांची दुहेरी हत्या, आमदार संग्राम जगतापांना पोलिस कोठडी