परभणी : परभणीमध्ये चक्क जीसीबी मशिनद्वारे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. पण एटीएम मशिन हालत नसल्याने, चोरट्यांनी जेसीबी तिथेच सोडून पळ काढवा लागला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलीस त्याद्वारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

शहरातील एमआयडीसी परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम सेंटर आहे. आज पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान चोरट्यांनी हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, त्यासाठी त्यांनी चक्क जेसीबीचाच वापर केला होता.

पण जेसीबी लावूनही एटीएम जागचे हालत नसल्याने, चोरट्यांनी जेसीबी तिथेच सोडून पोबारा केला. पण ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तिथल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, शहरातील वसमत रोड परिसर उचभ्रू वसाहतीत लहान-मोठ्या चोऱ्या नेहमीच्या झाल्या आहेत. पण रात्रीच्या वेळी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, पोलीस याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे.

मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला का असा प्रश्न विचारला जात आहे.