मुंबई : राज्यात पॅकिंग दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजे 16 डिसेंबरपासून दूध प्रति लिटर दोन रुपये दरवाढ लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्य कल्याणकारी दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कात्रज दूध संघात ही बैठक पार पडली. या बैठकीला 60 वेगवेगळ्या सहकारी आणि खासगी दूध संघाचे दीडशे पदाधिकारी उपस्थित होते. सध्या असलेल्या दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचं निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने दूध दरवाढीचा निर्णय घेतल्याचं संघाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. शेतकऱ्यांचा खरेदी दर 29 रुपये तर एफआरपीमध्ये दोन रुपये वाढ करण्याचा ठरावही केला आहे. राज्यामध्ये अंतर्गत वापरासाठी 85 लाख लिटर दूध पॅकिंगमध्ये विकलं जातं. या ग्राहकांना मात्र या दूध दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य कल्याणकारी दूध संघाच्या या बैठकीला राजाराम पाटील दूध संघ, बारामती, सोनाई, चितळे, पराग, अहमदनगरसह इतर जिल्ह्यातील दूध व्यवसायिकांनी हजेरी लावली होती.


अमूल, मदर डेअरी दूधही महागलं


मदर डेअरीने दुधाची किंमत तीन रुपयांनी तर अमूलने दोन रुपयांनी वाढवली आहे. टोंड दूध तीन रुपयांनी वाढल्याने 42 रुपयांना मिळणारं टोंड दूध आता 45 रुपयांना मिळणार आहे. तर अर्धा लीटर दुधाचे दर एक रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. तर फुल क्रीम दूध 53 रुपयांवरून वाढून 55 रुपये झालं आहे. अमूलने किंमत दोन रुपयांनी वाढवल्याने अमूल गोल्ड एक लीटर दूध 56 रुपयांना मिळणार आहे. उद्यापासून या नव्या किमती लागू होणार आहेत.


अमूल आणि मदर डेअरी दूध दरात दोन वर्षात तीनदा वाढ




  • मार्च 2017 मध्ये दूधाची किंमत मदर डेअरीने 3 रुपये प्रति लीटर तर अमूलने 2 रुपये प्रति लीटर वाढवली होती.

  • मे 2019 मध्ये मदर डेअरीने दुधाच्या किमतीत प्रति लीटर एक रुपयांची तर अमूलने 2 रुपयांची वाढ केली होती.

  • आता मदर डेअरीने तीन रुपयांनी तर अमूलने दोन रुपायंनी दुधाचे दर वाढवले आहेत.


याचाच अर्थ अमूल आणि मदर डेअरीने आपल्या दुधाच्या किमतीत तीन वर्षात 6 ते 7 रुपायांनी वाढ केली आहे. दुधाच्या किमती वाढल्याने दुग्धजन्य पदार्थही महाग होतात. त्यामुळे मिठाई, दही, पनीर, लस्सी, ताक असे पदार्थ आता महाग होणार आहेत हे नक्की.