Amravati Lok Sabha Election : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि शिवसेना (Shivsena) नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यात असलेला राजकीय वाद सर्वश्रुत आहे. अशातच आज राणा दाम्पत्याने अचानकपणे अभिजीत अडसूळ यांच्या निवासस्थानी भेट देत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अमरावती मतदारसंघातील राजकीय वाद शमलाय का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जातोय. कारण, कधीकाळी खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे सांगत त्या विरोधात न्यायालयात धाव घेत आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. शिवाय, नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवला आहे. 


राजकारणात कायम कोणी शत्रू किंवा मित्र नसतं


रामनवमीच्या निमित्ताने आमदार रवी राणा आणि अमरावती लोकसभेच्या भाजप उमेदवार खासदार नवनीत राणा यांनी आज शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतलीय. यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी आपल्या पत्नीसह औक्षन केले.


यासंदर्भात बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, मोदीजींच्या चारसो पार नारा पूर्ण करण्यासाठी आम्ही आज रामनवमीच्या मुहूर्तावर सोबत भेट घेतली. येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या ध्येयधोरण आणि मोदीजींच्या विकासाच्या धोरणाला साथ देत एक दिलाने लढू. सोबतच, राजकारणात कोणीही कायम मित्र किंवा शत्रू नसतो. त्यामुळे राजकारणात बदलणारे समीकरण आणि त्या आधारे होणाऱ्या युती- आघाड्या या लोककल्याणासाठी असतात, असेही ते म्हणाले.


अभिजीत अडसूळ काय म्हणाले? 


तर या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते कॅप्टन अभिजीत अडसूळ म्हणाले की, रामनवमीच्या मुहूर्तावर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सदिच्छा भेट दिली. आम्ही त्यांचे औक्षवन करून स्वागत केले. सध्या आम्ही जिल्हाप्रमुख आणि महिला जिल्हाप्रमुख, इतर कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पुढची भूमिका स्पष्ट करणार आहोत. या संदर्भात कार्यकर्त्यांच्या मताला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे कार्यकर्ते निर्णय घेऊन भूमिका ठरवतील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. असे कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी बोलताना स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या