अमरावती : विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. अमरावतीत मुसधार पावसामुळे पिंगळाई नदील पूर आला आहे. सात ते आठ जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. दरम्यान बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं असून, बचावकार्य सुरू आहे. त्याचसोबत तिवसातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून, अतोनात नुकसान झालं आहे.
अमरावती जिल्ह्यात काल रात्री पासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून संततधार पावसामुळे जिल्ह्यातील तिवसा शहरातील सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. तसेच सातरगाव आणि इतर भागत देखील पावसाचे पाणी शिरले असून नागरिकांच्या घरात देखील पावसाचे पाणी शिरले आहे. या पुरामुळे 30 ते 35 नागरिक भाजीमंडीमध्ये अडकून पडले होते. त्यांना दोन ते तीन तासानंतर अमरावती रेस्क्यू टीमने सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढले. गावातून वाहणाऱ्या पिंगळाई नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने गावात पाणी शिरले आहे. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी गावात पोचले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक देखील गावात दाखल झाले आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असल्याने पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे.
तिवसा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान पूर स्थितीमुळे अनेक जण बेघर झाले त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. या दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यात पाहणी केली आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसानीची त्यांनी पाहणी केली आहे. याशिवाय अमरावतीच्या अनेक भागात नुकसान असल्याने खासदार अनिल बोंडे हे देखील पाहणी दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करत आहे. नैसर्गिक नुकसान असल्याने नुकसान भरपाई तातडीने मिळावी अशी मागणी करण्यात येते आहे. यावेळी शेतीचं मोठ्या प्रमाणात झालं नुकसान झालं असून शेतकऱ्यांनी नुकतंच पेरणी केली त्यामुळे आता त्यांना पुन्हा पेरणी करावी लागणार आहे.
संबंधित बातम्या :