अमरावती : गतवर्षी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने दुबारचे संकट ओढवले होते. त्यामुळे मृग नक्षत्र लागले असले तरी यंदा हे संकट उद्भवू नये, याकरिता 17 जूनपर्यंत पेरणी नकोच, असा सल्ला विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिला आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यात यंदा 7 लाख 28 हजार हेक्टरवरील खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे बाजारात सध्या धूमशान सुरु आहे. यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्राच्या 37 टक्के म्हणजेच 2 लाख 70 हजार हेक्टरमध्ये सोयाबीन आहे. 'कॅश क्राप' या अर्थाने दरवर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढतच आहे आणि परतीच्या पावसाने काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने सोयाबीनमध्ये आंतरपीक महत्त्वाचे ठरत आहे. याशिवाय 2 लाख 52 हजार हेक्टरमध्ये कपाशीचे पीक प्रस्तावित आहे. 


सुरुवातीला पाऊस कमी झाल्यास कपाशीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. तुरीचे पीक अमरावती जिल्ह्यात हमखास होतेच, अशी स्थिती असल्याने आंतरपिकासाठी तुरीला सर्वाधिक पसंती आहे. यंदा 1 लाख 30 हजार हेक्टर प्रस्तावित असले तरी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय 20 हजार हेक्टरमध्ये मुंग आणि 10 हजार हेक्टरमध्ये उडीद प्रस्तावित आहे. तसे पाहता, 60 दिवसांचे हे पीक मागील पाच वर्षात शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. यंदा पाऊस समाधानकारक राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असल्याने शेतकरी आश्वस्त आहेत. याशिवाय 22 हजार हेक्टरमध्ये ज्वारी, 4 हजार हेक्टरमध्ये धान, 15 हजार हेक्टरवर मक्का आणि 6 हजार हेक्टरमध्ये इतर पिके राहतील. पेरणीपूर्वी बियाणांची उगवणशक्ती तपासणी आणि बिजप्रक्रिया महत्वाची असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.


अमरावती जिल्ह्यातील तालुका निहाय पेरणी क्षेत्र हेक्टरमध्ये :


अमरावती तालुका : 62 हजार 746 हेक्टर 
धारणी तालुका : 54 हजार 388 हेक्टर 
चिखलदरा तालुका : 27 हजार 124 हेक्टर 
अचलपूर तालुका : 41 हजार 770 हेक्टर 
अंजनगाव सुर्जी तालुका : 44 हजार 495 हेक्टर 
भातकुली तालुका : 50 हजार 624 हेक्टर 
दर्यापूर तालुका : 77 हजार 662 हेक्टर 
नांदगाव खंडेश्वर तालुका : 67 हजार 710 हेक्टर 
चांदुररेल्वे तालुका : 41 हजार 466 हेक्टर 
धामणगाव रेल्वे तालुका : 55 हजार 857 हेक्टर 
तिवसा तालुका : 46 हजार 880 हेक्टर 
मोर्शी तालुका : 56 हजार 894 हेक्टर 
वरुड तालुका : 50 हजार 241 हेक्टर 
चांदूरबाजार तालुका : 50 हजार 495 हेक्टर


अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांचा सल्ला


जमिनीत किमान सात इंच ओल किंवा 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. बियाणे महाग आहे. त्यामुळे दुबार पेरणीचा खर्च परवडणारा नाही. शेतकऱ्यांनी 15 ते 17 जूननंतरच पाऊस पाहून पेरणी करावी आणि बियाण्यांची उगवणशक्ती तपासावी, बीजप्रक्रिया करावी. याशिवाय तीळ, तूर किंवा ज्वारी, तूर यासारखे पीकदेखील फायदेशीर ठरू शकतात. सोयाबीन सारख्या पिकाची घरच्या घरी उगवण श्रमता तपासणी करूनच पेरणी करावी आणि आता कोणतही पीक घेतांना बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय चवाळे यांनी दिला आहे. 


सोबतच सोयाबीनच्या पिकाला खूप खर्च येतो त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीची अजिबात घाई करू नये. जोपर्यंत तीन-चार मोसमी पाऊस पडत नाही आणि 100 मिमी पाऊस पडत नाही सोबतच जमिनीत किमान सात इंच ओल आपल्या जमिनीत जात नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नये. जी सोयाबीनचं बियाणे पेरायच आहे त्याची उगवण श्रमता घरच्या घरी तपासणं गरजेचं आहे जेणे करून आपल्याला होणारा खर्च वाचेल आणि नंतर त्रास होणार नाही. कोरोना महामारीमुळे आपण लस घेण्यासाठी जसं आग्रही आहो त्याचपद्धतीने बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये.


सोयाबीन पेरताना काय काळजी घ्यावी 


सोयाबीन पेरतांना चार ओळ पेरल्या नंतर एक ओळ रिकामी सोडली जाईल असं बघा, जेणे करून बियाणांची बचत होईल आणि जास्त पाऊस झाला तरी फायदा होईल आणि पाऊस कमी झाला तरीही त्याचा फायदाच होईल. 


कपाशी पेरताना काय काळजी घ्यावी


कपाशीची बियाण्यांची जेवढी  वाहनं शेतकरी बाजारात घेत आहेत. ती सगळी वाहनं संक्ररीत आहेत. त्यामुळे कपाशीला पेरणी करताना भारी जमीन असेल तर 3 बाय 3 अंतरावर आणि मध्यम जमीन असेल तर 3 बाय 2 वर टोकन पद्धतीने करावी. अनेक शेतकरी एका एकरात घनदाट पद्धतीने चार-पाच पाकीट वापरून खर्च वाढवतो. पण ते शेतकऱ्यांनी ते टाळावं. एक ते सव्वा पाकीटच वापरावे.