अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना जोरदार झटका बसला असून त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध आहे आणि येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रं जमा करावे असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील निकाल दिला. 


अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ होता. त्या मतदारसंघातून नवनीत राणा या निवडून आल्या होत्या. त्यांच्या या निवडीवर आक्षेप घेताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगितलं आहे. त्यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


खासदार नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र न्यायमूर्ती धानुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने रद्द केलंय. हे प्रमाणपत्र घेताना त्यांनी खोटी आणि बनावट कागदपत्र सादर केली होती असं निरीक्षण हायकोर्टांने नोंदवलं आहे. त्यांना सहा आठवड्यांमध्ये जात प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 


आनंदराव अडसूळ यांनी साल 2017 मध्ये नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या सहा आठवड्यांच्या मुदतीत खासदार नवनीत राणा आपलं जात प्रमाणपत्र सादर करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


महत्वाच्या बातम्या :