Uday Samant : नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता गुजरातमधील (Gujarat) वडोदऱ्याला होणार आहे. या मुद्यावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टाटा एअरबसचा ( Tata-Airbus) प्रकल्प नागपुरात आणण्यासाठी मी प्रयत्न करतो असं म्हटलो होतो, प्रयत्न करणं हे काय पाप होऊ शकत नाही.  दरम्यान, जो शब्द मी माझा कट्ट्यावर दिला होता, त्याच्याशी मी आजही ठाम असल्याचे सामंत म्हणाले. भविष्यात वेदांता किंवा  टाटा एअरबसपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणणार आहे. त्यामुळं बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल असे सामंत म्हणाले.


सामज्यंस करार झाला तर त्याबाबतचे एकतरी पत्र दाखववावं


टाटा एअरबसच्या प्रकल्पाबाबत अशी माहिती समोर आली की, 21 सप्टेंबर 2021 ला या प्रकल्पाबाबतचा सामज्यंस करार झाला होता. मात्र, करार झाला होता तर त्याबाबतचे मला एकतरी पत्र दाखववावे असे उदय सामंत म्हणाले. सरकारमध्ये नसताना बैठका सकारात्मक झाल्या हे सांगायला खूप सोपं आहे. आधीच्या सरकारनं याबाबत ठोस काम केलं नसल्याचेही सामंत म्हणाले. राजकारणासाठी राजकारण करु नये, विकासासाठी सर्वांनी एकत्र येण गरजेचं असल्याचेही सामंत यावेळी म्हणाले.


 



विरोधी पक्षनेता असताना देवेंद्र फडणवीसांनी प्रकल्प राज्यात राहावा यासाठी प्रयत्न केला


टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात यावा यासाठी मी प्रयत्न केले. युवा पिढीसाठी मी प्रयत्न केला त्यात माझं काही चुकलं नाही. रोजगार देण्यासाठी नुसत्या गप्पा मारुन काही उपयोग नाही. संभ्रम करुन उपयोग नाही. सांघीक प्रयत्न व्हायला हवेत असेही उदय सामंत यावेळी म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षनेता असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा प्रकल्प नागपूरमध्ये व्हावा यासाठी प्रयत्न केला होता असे सामंतांनी सांगितलं. आपलं अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करणं चुकीचं असल्याचे ते म्हणाले. रोजगार दूर करणं ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री म्हणून आमची जबाबदारी आहे.  त्यामुळं आताच पुढच्या प्रकल्पाबाबत घोषणा करणं घाईचं ठरेल असेही सामंत यावेळी म्हणाले.


माझा कट्ट्यावर नेमकं काय म्हणाले होते उदय सामंत 


वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प हा गुजरातला गेला असला तरी येत्या काही दिवसात चांगला प्रकल्प महाराष्ट्राला मिळेल असे उदय सामंत म्हणाले होते. तसेच ड्रग्ज पार्कचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये टाटा एअरबसचा प्रकल्प होणार असल्याची माहिती देखील सामंत यांनी यावेळी दिली. तसेच रिफायनरी प्रकल्पाबाबत (Refinery Project) गैरसमज पसरवले जात आहे. मात्र, रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नसल्याची माहिती देखील उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली होती. रिफायनरी प्रकल्पामुळं मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याचेही सामंत यावेळी म्हणाले होते.  


महत्त्वाच्या बातम्या:


Uday Samant : टाटा एअरबस प्रकल्प नागपुरातच, उदय सामंतांनी माझा कट्ट्यावर केलं होतं मोठं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाले होते सामंत