Maharashtra Unseasonal Rain : हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) अंदाज वर्तवला आहे. त्यातच ठाणे, कल्याण-डोंबिवली, धुळे, जळगाव या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. ठाण्यात होळी दहनाचा कार्यक्रम सुरु असतानाच पावसाने बरसायला सुरुवात केली. तर कल्याण डोंबिवली, भिवंडीतही पावसाने दिवसभर हजेरी लावली. दुसरीकडे जळगावमध्ये अवकाळी पावसाने आणि धुळे जिल्ह्यात गारपिटीने (Hail Storm) पिकांचं मोठं नुकसान केलं आहे.


ठाण्यात होळी दहनालाच पावसाची हजेरी


ठाणे शहरात गुरुवारी दिवसभर मोठा सोसाट्याचा वारा सुटला होता. दिवसभर ठाणे शहराच्या हवेत अनेक धुळीचे कण पसरलेले दिसून आले होते. कल्याण डोंबिवली, भिवंडी अशा विविध शहरात आज पावसाने दिवसभरात हजेरी लावली होती. त्यातच रात्रीच्या सुमारास ठाणे शहरात देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाण्याचा चंदनवाडी या परिसरात होळी दहनाचा कार्यक्रम सुरु असताना पावसाने हजेरी लावली. होळी दहन करणाऱ्या नागरिकांनी पावसाचा आनंद घेत होळी साजरी केली आहे.


कल्याण डोंबिवलीत मध्यरात्री रिमझिम पाऊस


हवामान खात्याकडून येत्या काही महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात गुरुवारी (7 मार्च) काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी चारनंतर अचानक सोसाट्याच्या वारा सुटला होता. वाऱ्यासोबत धूळही हवेत उडाल्याने कल्याण डोंबिवलीत धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं तर मध्य रात्रीच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. 


पालघर जिल्ह्यात वीज पडून आग लागल्याच्या घटना


पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आजही ढगाळ वातावरण आहे. तर रात्री वेगवेगळ्या भागात पावसाच्या सरी बरसल्या असून आंबा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर या अवकाळी पावसाचा फटका बागायती शेतीबरोबरच रब्बी पीक वीट भट्टी व्यवसायिक आणि गवत पावली व्यवसायालाही बसला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी उंच झाडांवर आकाशी वीज पडून आग लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. वडराईमध्ये नारळाच्या झाडावर तर वेति मध्ये ताडाच्या झाडावर आकाशी वीज पडून आग लागली.


जळगावात केळी, गहू, हरभरा आणि मका पिकाला फटका


जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याने केळी,गहू, हरभरा आणि मका या पिकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यात जोरदार वादळी वारा झाल्याने केळी, गहू, हरभरा आणि मका या पिकांचं नुकसान झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे


धुळ्यात गारपीट, पिकांचं मोठं नुकसान


धुळे जिल्ह्यात अवकाळी बुधवारी पावसाने हजेरी लावल्यानंतर गुरुवारी गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून घेतला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. एकीकडे संपूर्ण राज्यात होळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा होत असताना दुसरीकडे निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. जिल्ह्यातील खोरी टिटने भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून यामुळे पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अक्षरशः रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली असून ऐन होळी सणाच्या दिवशी निसर्गाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.


छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागात पाऊस 


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल रात्रीपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. कुठे रिमझिम तर कुठे सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडताना पाहायला मिळाला. जिल्ह्यात अजूनही ढगाळ वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अजूनही कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. रात्री पाचोड, पैठण, वैजापूर, वाळूज, देवगाव रंगारी, चापनेर,पिंप्रीराजा भागात पावसाने हजेरी लावली आहे.