Maharashtra Political Crisis Update : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच  अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून 
सुप्रीम कोर्टात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. उद्या या याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे.


महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाचा खेळ अखेर अपेक्षेप्रमाणे सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सुनील प्रभूंच्या नियुक्तीविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमार्फत शिंदे गटाने  विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं थेट आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे,भरत गोगावले या दोघांकडून दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. 






विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात दिलेली नोटीस बेकायदेशीर आहे.  गटनेते, प्रतोद नियुक्त्या अवैध पद्धतीने केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच शिंदे गटाकडून उपाध्यक्षांकडून आलेला अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळल्याचे देखील म्हटले आहे.


बंडखोरांविरोधात कायदेशीर लढाई लढणार : अरविंद सावंत


शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले की, मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटी थांबले आहेत. दररोज वेगवेगळ्या क्लिप, बातम्या समोर येत आहेत. त्याशिवाय, शिंदे गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. आमच्याकडून आमदारांवरील कारवाईबाबत कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. बंडखोरांविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही सूतोवाच त्यांनी केले. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी कोर्टात धाव घेण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या आमदारांना 27 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आमदार अपात्र ठरल्यास शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे.