मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांची भेट घेतली आहे. यावेळी अमित शाह यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांनी या भेटीचे फोटो ट्विट केले आहेत.
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. दोघांनाही शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करतील आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास आहे, असे ट्विट अमित शाह यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी दोघांनीही अमित शाह यांची भेट घेतली. उद्या सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांची देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट घेणार आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.
मुख्यमंत्री दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील. पुण्याहून मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार आहेत. तेथे त्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त विठ्ठलाची पूजा होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीतून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर पोहचतील असं सांगण्यात आलंय. पुणे विमानतळावरून ते आषाढी एकादशीनिमित्त करण्यात येणाऱ्या शासकीय पुजेसाठी पंढरपूरला रवाना होतील.
पुणे विमानतळावरून निघाल्यानंतर हडपसर गाडीतळ भागात शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगीरे यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात एकनाथ शिंदे उपस्थित राहतील. यावेळी शिवसेनेतील काही नेते आणि पदाधीकारी देखील हडपसमधे उपस्थित राहणार आहेत. हडपसरमधे आयोजित करण्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या या सत्काराच्या कार्यक्रमास कोण कोण उपस्थित राहतील? याकडे शिवसेना नेतृत्वाचं लक्ष असणार आहे.