CM Uddhav Thackeray : जवळपास अडीच महिन्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी स्पाइन सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्क मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.


जवळपास अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहणार १२ नोव्हेंबरला झालेल्या स्पाईन सर्जरीनंतर ते आतापर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका, कार्यक्रमांना उपस्थित राहत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना 2 डिसेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमात, शासकीय बैठकांना प्रत्यक्षपणे अनुपस्थित राहत असल्याने भाजपने टीकाही केली होती. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसून येत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसैनिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले होते. 


मुंबई महापालिकेकडून तयारी 


उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कवर मुंबई महापालिकेकडून तयारी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता महापालिकेकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. 


विधानसभा अधिवेशनात अनुपस्थिती


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता यंदाचे विधीमंडळ अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहतील असे म्हटले जात होते. मात्र, हे अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडले होते. विधीमंडळ अधिवेशना दरम्यान कोरोनाबाधित कर्मचारी, आमदार आढळल्याने मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात उपस्थित न राहण्याची विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.  


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha