Lata Mangeshkwar Passes Away : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 


भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार सात फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि सहा फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( सन 1981चाअधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक सात फेब्रुवारी  रोजी राज्यात  दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.






लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनाकरता जशी व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आली होती. त्याप्रमाणेच शिवाजी पार्कवरच लतादीदींच्या अंत्यदर्शनाकरता व्यवस्था होणार असल्याची माहिती आहे. महापालिका थोड्या वेळात शिवाजी पार्कात स्टेज उभारणार आहे. अंतिमविधी शिवाजी पार्क स्माशानभूमी येथे होणार आहे. 







संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ
कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital)आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.


भारतरत्नसह विविध पुरस्कारांनी सन्मान
लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांना प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.