पुणे : दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा ढोलकीवर थाप पडतेय, दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा घुंगरू वाजत आहेत. कारण तमाशाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नारायणगावामध्ये आता तब्बल दोन वर्षांनंतर तमाशाचे फड रंगू लागले आहेत. कोरोना महामारीमुळे सर्वकाही ठप्प असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पण आता हळूहळू जनजीवन पुन्हा रुळावर येत असून आता तमाशाचे फड देखील पुन्हा रंगणार आहे. त्यामुळे नारायणगावमध्ये तमाशा कलावंतांच्या केंद्रांवर सुपारी देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील गावांतून लोक येता आहेत. 


कोरोनामुळे गेली दोन वर्ष महाराष्ट्रातील यात्रा-जत्रा बंद होत्या. त्यामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. आता पुन्हा गावोगावची आमंत्रण येऊ लागल्याने तमाशा कलावंतांना दिलासा मिळाला आहे.  गुढी पाडव्यानंतर गावोगावच्या यात्रांना सुरुवात होणार आहे. या यात्रांमधे तमाशाचा फड जोरात रंगावा यासाठी गावकरी नारायणगावमधे तमाशा कलावंतांना सुपारी देण्यासाठी पोहोचत आहेत. इथ उभारण्यात आलेल्या राहूट्यांमधे तमाशाचे सौदे पक्के होताना दिसत आहेत.


प्रसिद्ध अशा 32 राहूट्या नारायणगावात


नारायणगावात सध्या काळू-बाळू, विठाबाई नारायणगावकर, दत्तोबा तांबे, अंजलीबाई नाशीककर, मंगला बनसोडे, सुरेखा पुणेकर, रघुवीर खेडकर, मालती इनामदार अशा महाराष्ट्रातील लोकप्रिय तमाशा फडांच्या 32 राहूट्या उभारण्यात आल्या आहेत.  त्यामुळे या राहूट्यांमधे एकीकडे तमाशांच्या सुपाऱ्या फुटत असताना दुसरीकडे या कलावंतांचा सरावही जोरात सुरु आहे.  


मोठ्या सुपारीची अपेक्षा


तमाशाची पंढरी म्हणून नारायणगावची ओळख पन्नास वर्षांहून अधिक जुनी आहे.  वर्षांनवर्ष हे तमाशा कलावंत इथ राहूट्या घेऊन येत आहेत. दरम्यान यंदा महागाई जरा जास्तच वाढली असल्याने आपल्याला सुपारी देखील वाढवून मिळावी अशी अपेक्षा तमाशा कलावंत करत आहेत. तमाशा एक दिवस चालणार की दोन दिवसांचा, तमाशात किती कलाकार असणार, कोणते वग सादर होणार यावर सुपारी किती लाखांची हे पक्क होत असतं. 


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha