लातूर : आगामी काळातील लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने आज (रविवारी) भारतीय जनता पक्षाचे लातुरात 'बूथ विजय अभियान' पार पडत आहे. यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्यासह डझनभर मंत्र्याची उपस्थिती असणार आहे. त्याअनुषंगाने गेल्या आठ दिवसांपासून या अभियानाची जय्यत तयारी केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण शहर भाजपमय करण्यात आले आहे.

लातूर, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील बूथप्रमुखांची स्वतंत्र बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा घेणार आहेत. दिवसभर चारही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. सायंकाळी अमित शाहा एका सभागृहात व्यापारी, उद्योजक यांच्यासह प्रतिष्ठित नारिकांशी संवाद साधणार आहेत.

जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघ आणि सहा विधानसभा मतदार संघाच्या अनुषंगाने हे अभियान होणार आहे. भाजपने कॉग्रेसच्या बालेकिल्ल्यात सर्व ठिकाणी आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा निश्चय केला आहे. त्यानुसार तयारी सुरु आहे.

गेल्या चार वर्षात शासनाने राबवलेल्या योजना, प्रत्यक्षात किती जणांना याचा लाभ मिळाला, तसेच सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन आगामी काळात मार्गक्रमण कसे करायचे याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

अमित शाहा घेणार भजी-भाकरीचा आस्वाद
लातूर भागामध्ये आज वेळा अमावास्येचा सण मोठया उत्साहात साजरा केला जतो. आजच्या दिवशी शेतातील वन लक्ष्मीची पूजा केली जाते. शेतात येणाऱ्या धान्यांचे विविध खाद्य पदार्थ तयार करून नैवद्य दाखवला जातो.

आजच्या दिवशी भाज्यांपासून बनवली जाणारी भजी भाजली जातात. त्यासोबत बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, आंबील, शेंगदाणा, तीळ, जवस, कराळाची चटणी, तिळगुळ आणि शेंगदाण्याची पोळी यासह विविध खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यामुळे आजच्या दिवशी लातुरात येणारे अमित शाहादेखील भजी-भाकरीसह या लातूर स्पेशल पदार्थांचा आस्वाद घेणार आहेत.