मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीआधी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याला विशेष महत्व आहे.
आज दिवसभर भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत ठाण मांडून बसणार आहेत. तसंच सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीआधी अमित शाह मुख्यमंत्री, भाजपचे मंत्री आणि काही महत्वाच्या नेत्यांसोबत बैठका घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आज विधानभवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होणार आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी अद्यापही राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाजाची आंदोलने सुरु आहेत. त्यामुळे आज विधानभवनात होणाऱ्या बैठकीकडे साऱ्या महराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
उपसमितीची मागासवर्गीय आयोगाला भेट
मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीनं मागासवर्गीय आयोगाची काल भेट घेतली. या समितीने अहवाल लवकरात लवकर दिला जावा अशी मागणी केली.
चंद्रकांत पाटील यांची माहिती
ज्या मागास आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार तो अहवाल लवकर यावा यासाठी मागास आयोगाच्या अध्यक्षांना आम्ही पत्र दिले. हा रिपोर्ट लवकर यावा अशी समाजाची मानसिकता आहे असे आम्ही त्यांना सांगितले, असं उपसमितीचे प्रमुख आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
आयोगाला आज आम्ही एक विनंती पत्र दिले. 31 जुलैपर्यंत सर्व्हे पूर्ण होणार आहे. आतापर्यत 1 लाख 87 हजार मराठा समाजची निवेदन आली आहेत. जलद काम करण्यासाठी सरकार आवश्यक ती मदत करेल. त्यांना आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग आणि सुविधा सरकार देणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
शिवसेना नेत्यांना डावललं?
(दरम्यान मागासवर्गीय आयोगासोबतच्या बैठकीत चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, आशिष शेलारांसह अनेक भाजप नेते उपस्थित होते मात्र उपसमितीतील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंना डावलल्याची चर्चा रंगली होती.
सरकार आरक्षणाचा तातडीने विचार करेल: राणे
हिंसक आंदोलन थांबल्यास सरकार मराठा आरक्षणाबाबत तातडीने विचार करेल, असं मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलंय. सरकारनं मराठा समाजाला विश्वास बसेल अशी भूमिका घ्यावी असं मतही राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्री आणि मराठा समाजाच्या नेत्यांना भेटलो असून, सकारात्मक भूमिका घेतल्यास दोन दिवसांत त्यांची भेट घडवून आणणार असल्याचंही राणे म्हणाले.
माझा कट्ट्यावर चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
आषाढी वारीत साप सोडण्याबाबतचं संभाषण आमच्या हाती असल्याचा गौप्यस्फोट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझा कट्टावर केला. तसं संभाषण करणाऱ्यांची आणि मराठा आंदोलनात हिंसा भडकवणाऱ्यांची नावं आमच्या हातात असल्याचंही पाटील म्हणाले. सरकारकडून त्यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात झाल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता सरकार यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर याच सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा दावाही त्यांनी माझा कट्टावर केलाय.
मुख्यमंत्री बदलणार नाही: गडकरी
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा भाजपमध्ये नसल्याचं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण पक्ष देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं गडकरी म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.
आर्थिक निकषावर आरक्षण द्या: राज ठाकरे
जातीवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं पाहिजे. आताचं सरकार आणि मागचं सरकार हे तुमच्या भावनांशी खेळ खेळत आहे. अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यात बोलताना राज यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळं समाजात विष कालवलं गेलं. स्थानिकांना जर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या तर आरक्षणाची गरजच राहणार नाही, असंही राज ठाकरे म्हणालेत.
संबंधित बातम्या
मुख्यमंत्री बदलावर नितीन गडकरी म्हणतात...
आर्थिक निकषावर आरक्षण द्या: राज ठाकरे
माझा कट्ट्यावर चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
मराठा आरक्षणासाठीच्या बैठकीदिवशीच अमित शाह मुंबई दौऱ्यावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2018 12:40 PM (IST)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीआधी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याला विशेष महत्व आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -