मुंबई : जे सरकार काम करत तेच निवडणुक जिंकतात, देशात आपण सलग तिसरे सरकार बनवले. आता आपली निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका असं सांगत महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी व्यक्त केला. यंदा राज्यात महायुतीचे सरकार येईल, पण 2029 साली एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची आहे असंही अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर असून त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी सूचना दिल्या.
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असं अमित शाह म्हणाले. महाराष्ट्रात सत्ता आल्यास समान नागरी कायदा आणण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही असंही अमित शाह म्हणाले.
महाराष्ट्राची विधानसभा महायुतीत जिंकेल
अमित शाह म्हणाले की, गेल्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तीन वेळा सरकार बनविण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केला. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक आहे आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुती जिंकणार. महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढवा, विजय महायुतीचाच होईल. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रात महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही.
भाजप विचारधारेसाठी काम करणारा पक्ष
भाजप राज्य करण्यासाठी सत्तेत नाही तर विचारधारेवर काम करण्यासाठी सत्तेत आहे असं सांगत अमित शाह म्हणाले की, राम मंदिर, 370 हटवणं हे काम करण्यासाठी भाजप सत्तेत आली. महाराष्ट्रात निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करणार. महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. भाजपचं सरकार आल्यानंतर गेल्या 10 वर्षात दहशतवाद आणि नक्षलवाद गाडला गेला. मोदीजींच्या नेतृत्त्वामुळे जगात भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे
प्रत्येक बुथवर 10 कार्यकर्ते ठेवा
अमित शाह म्हणाले की, 10 टक्के मतदान वाढवा. सरकार आपले आहे त्यामुळे आपल्याविरुद्ध नाराजी असेल. नगरसेवक, आमदार व खासदारांच्या विरोधात असलेली नाराजी दूर करा. प्रत्येक बूथवर आपल्याला 10 कार्यकर्ते पाहिजेत. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बुथच्या कक्षेत फिरत राहतील. आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा. प्रत्येक बूथवर किमान 20 लोकांना भाजपचे सदस्य करा. सदस्य करताना मतं मागू नका. सदस्य झाल्यावर त्याला आपसुकच मतदानाचे महत्त्व कळेल.
सहा ठिकाणी आपण जिंकू, विरोधक एका ठिकाणी जिंकतील
लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण करताना अमित शाह म्हणाले की, राज्यातील 6 लोकसभा अशा आहेत, जिथे 5 विधानसभांमध्ये आपल्याला बहुमत होते पण एका ठिकाणी विरोधक बहुमत घेऊन जिंकले. याचा अर्थ 6 विधानसभा आपण जिंकू तर ते एकच जिंकतील. महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यान्वित करा. मंडल व वॉर्ड स्तरावर योजना पोहोचवा. विजय आपलाच असेल.
अमित शाह म्हणाले की, मी कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत मजल मारली. म्हणून मी जेव्हा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतो तेव्हा मला खूप आनंद होतो. काही निवडणूक या देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात. माझ्या अनुभवावरून सांगतोय. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा व दशा बदलेल. गेल्या वर्षांत कुठलाही राजकीय पक्ष सलग तीन वेळा जिंकलेला नाही
ही बातमी वाचा :