बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव येथे आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थिती लावत प्रचाराचा नारळ फोडला. अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नागरिकांनी आभार मानले. यावेळी 370 कलम रद्द केल्यामुळे अमित शाहांना 370 तोफांची सलामी देण्यात आली.


पाच वर्षांपूर्वी मी दसऱ्याच्या दिवशीच भगवान गडावर आलो होतो. आज भगवानभक्ती गडावर आलो आहे. दिवंगत गोपीनाथरावांच्या पावलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे वाटचाल करत आहेत. ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडेंनी जे काम केलं, तेच काम आज पंकजा मुंडे करत असल्याचं अमित शाहांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. वंचितांचा विकास सरकार करत आहे, असंही अमित शाहांनी म्हटलं.


कलम 370 हटवून संपूर्ण देशाला एकत्र आणण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले. तुम्ही मोदी सरकारला स्पष्ट बहुमत दिलं, त्यामुळे मोदी सरकारने कलम 370 रद्द करुन दाखवलं, असं अमित शाह यांनी म्हटलं.


जमलेली गर्दी भविष्यातील दिशा ठरवणारी : पंकजा मुंडे 


अमित शाह भगवानबाबांच्या भूमीत आले आहेत. त्यांच्या नेतृत्वात आणखी मोठं सीमोल्लंघन होणार आहे. आज जमलेली गर्दी भविष्यातील दिशा ठरवणारी आहे. मी मोदीजींचा आशीर्वाद घेतला आणि मोदींनी मला आशीर्वाद दिला. पुढच्या पाच वर्षांनंतर या माझ्या लोकांना कोयता हाती घेऊ देणार नाही, असं आश्वासन पंकजा मुंडेंनी ऊसतोड कामगारांना दिलं.


आमचा हा प्रचाराचा नारळ नाही, तर देशभक्तीचा कार्यक्रम आहे. या भक्तीची ही शक्ती आहे. अहंकाराचा गड उतरून मी भगवान गडावरुन खाली आले आहे. तुमचा स्वाभिमान टिकवणे हे माझे ध्येय आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.