Amit Deshmukh in Sangli Vita: भाजपत जाण्याच्या चर्चेवर काँग्रेस नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी आज स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. 'कितीही संकटं आली तरी देशमुख वाडा आहे तिथेच राहणार' अशा शब्दात अमित देशमुखांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशमुख बंधू भाजपात जाणार अशी चर्चा सुरु आहे. यावर आज सांगलीतील (Sangli News) विटामधील एका कार्यक्रमात देशमुख यांनी मोकळ्या ढाकळ्या शैलीत स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसला खिंडार पडणार अशाच चर्चा होत्या. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि लातूरचे देशमुख बंधू भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या. त्यातच भारत जोडो यात्रेतील सहभागावरुनही दोन्ही नेते कायम चर्चेत राहिले.
विटा येथील नेचर केअर फर्टिलायझर्सचे संस्थापक, जयंत वामन तथा बाबा बर्वे यांच्या कृषी क्षेत्रातील अनमोल कामगिरीबद्दल आयोजित कृतज्ञता सोहळ्यात अमित देशमुख बोलत होते.
अमित देशमुख म्हणाले की, सध्या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे, किंवा तसे तूर्त तरी म्हणावे लागत आहे. हे सरकार वैध की अवैध हे सर्वोच्य न्यायालयात सुनावणी साठी प्रलंबित आहे आणि आता कोर्ट सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता राखा. आताची पाच वर्षे ही चमत्कारिकच राहिली. सध्या राज्यात तिसरे सरकार सुरु आहे. पहिले सरकार हे अडीच दिवसाचे होते. दुसरे सरकार हे अडीच वर्षाचे तर तिसरे सरकार हे सध्या सुरु आहे आणि चौथे सरकार कधीही येऊ शकेल, काहीही सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे, असा इशारा देखील देशमुखांनी दिला आहे.
देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये चांगलं काम सुरु झालं होतं. आताच्या सरकारला नाव ठेवायचं तरी काय? मुख्यमंत्री हे आपले आहेत आणि उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत, असा टोला त्यांनी लगावला. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हे तुम्हाला कळतं का? हा आम्हाला प्रश्न पडला आहे, असंही ते म्हणाले.
देशमुख म्हणाले की, आता निवडणुका महाराष्ट्रात होतच नाहीये. या निवडणुका कधी होतील हे ही सांगता येत नाही. अस्थिर परिस्थितीला आपण सगळे तोंड देत आहोत, असं देखील ते म्हणाले.
ही बातमी देखील वाचा