मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आज दोन नवीन उपक्रम सुरू केले आहेत. लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी रेल्वे सुरक्षा दलाचा ऑनलाइन स्मार्ट सहेली हा उपक्रम सुरू करण्यात आला. तर संपूर्ण मध्य रेल्वेवरील सतरा स्थानकांवर अतिशय अद्ययावत अशी व्हिडिओ सर्वेलांस सिस्टिम बसवण्यात आली याचे उद्घाटन आज करण्यात आले. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या दोन्ही उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.
महिलांसाठी सुरु करण्या आलेला ऑनलाइन स्मार्ट सहेली उपक्रम प्रवासी महिलांच्या सहभागातून पुढे नेण्यात येणार आहे. यामध्ये अभिनव कल्पना राबवून व्हाट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार आहेत. त्यातील प्रत्येक व्हाट्सअप ग्रुप मध्ये एखाद्या लोकलमधून नियमित प्रवास करणाऱ्या चार महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. सोबत या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आर पी एफ चा महिला अधिकारी आणि मध्य रेल्वेचे अधिकारी देखील समाविष्ट असतील. यातून काही महिलांना विशिष्ट जबाबदारी देण्यात येईल. त्याद्वारे धावत्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांवर अत्याचार, अन्याय किंवा महिला डब्यांमध्ये एखादा गुन्हा घडत असेल तर त्याची माहिती इथे आरपीएफ ला कळेल. आणि तो गुन्हा घडायच्या आधीच आरपीएफ महिला डब्यात पोहोचलेली असेल. यामध्ये आरपीएफ महिला प्रवाशांसोबत जीआरपीची देखील मदत घेणार आहे.
तर दुसऱ्या उपक्रमातून अद्यावत तंत्रज्ञान वापरून स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षा अबाधित राखली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या सतरा वेगवेगळा स्थानकांवर बसवलेल्या आयपी बेस्ड व्हिडिओ सर्वेलांस सिस्टिम' रेल टेल द्वारे बसवण्यात आले आहे. ही एक अद्ययावत यंत्रणा असून रेल्वेस्थानकांवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी आणि उघडकीस आणण्यासाठी या यंत्रणेचा खूप फायदा होणार आहे. यंत्रणेत स्थानकांच्या विविध ठिकाणी हाय डेफिनेशन असलेले अद्ययावत कॅमेरे बसवले जातात. त्यातून रेकॉर्ड होणारे सर्व व्हिडीओ हे एका मध्यवर्ती नियंत्रण कक्षात बसून आरपीएफ द्वारा पाहिले जातात. त्यामुळे गुन्हे घडण्याच्या आधीच ते रोखता येणे शक्य होते. त्याचप्रमाणे या सिस्टीम मध्ये फेस डिटेक्शन म्हणजेच एखादा हवा असलेला आरोपी किंवा हरवलेला व्यक्ती शोधण्यासाठी देखील सॉफ्टवेअर असते. त्यामुळे या यंत्रणेचा मोठा फायदा रेल्वे प्रशासनाला होतो. संपूर्ण महाराष्ट्रातील मध्य रेल्वेच्या विविध 17 स्थानकांवर आजपासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.