अंबरनाथ : मराठी कामगारांना कामावरून काढणाऱ्या अंबरनाथ एमआयडीसीतील कंपनीविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. एमआयडीसीतल्या एएसबी या जपानी कंपनीने काही दिवसांपूर्वी तीन मराठी कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकलं होतं. या प्रकरणी आज (गुरुवार) मनसेने कंपनीवर धडक दिली.


मनसेनं कंपनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत जोपर्यंत समाधानकारक उत्तरं मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या देण्याचा पवित्रा घेतला. यानंतर मनसेकडून कंपनी प्रशासनाला 24 तासांची मुदत देण्यात आली. येत्या 24 तासात जर कामगारांना परत कामावर घेण्यात आलं नाही, तर मनसे स्टाईलने कंपनीला धडा शिकवण्यात येईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.

अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या या कामगारांचा परफॉर्मन्स चांगला नसल्याचं कारण देत कंपनीने यांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकलं. याविरोधात कामगारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितली. यानंतर आज (गुरुवार) मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीतील कंपनीविरोधात मनसेनं ही धडक दिली.