रत्नागिरी : अंबेनळी बस अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई हेच या अपघाताला कारणीभूत आहेत, असा आरोप अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रकाश सावंत देसाई यांना विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ करा आणि सीआयडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.


अंबेनळी अपघातातील मृतांचे नातेवाईक डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठावर धडकले. प्रकाश सावंत देसाई यांना विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात यावं, त्यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, तसंच त्यांची नार्को टेस्ट करुन दोषी आढळल्यास त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडे केली.

पावसाळी सहलीला निघालेल्या दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या बसला 28 जुलै रोजी अंबेनळी घाटात अपघात झाला होता. या अपघातात बसमधील 31 पैकी 30 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली.

अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई हेच या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप यापूर्वीही काही मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. अपघाताला महिना झाल्यानंतर संयम सुटलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी थेट विद्यापीठावर धडक दिली.

प्रकाश सावंत देसाई माध्यमांकडे वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होते. ज्या ठिकाणी अपघात होऊन बस दरीत कोसळली, तिथला पूर्ण भाग हा कातळ आहे, तिथे मातीचा लवलेशही नाही, तिथून ट्रेकर्सही सहजरित्या वर चढू शकत नाहीत, मग प्रकाश सावंत देसाई कोणत्याही साधनाशिवाय वर कसे येऊ शकतात, पलटी होत असलेल्या बसमधून स्वतः तीन ते चार कोलांट्या खाल्ल्याचं प्रकाश सावंत देसाई सांगतात, मग एवढ्या कोलांट्या खाऊन बाहेर फेकला गेलेला माणूस सहजरित्या वर कसा येऊ शकतो, त्याच्या विधानांमध्ये विसंगती असून हाच गाडी चालवत होता आणि तोच या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमोर केला.

अशा व्यक्तीला विद्यापीठाच्या सेवेत ठेवणं योग्य आहे का? त्यांची नुसती बदली करुन चालणार नाही, तर त्यांना सेवेतून बडतर्फ करुन चौकशी करावी. सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, तसेच नार्को टेस्ट करण्यात यावी आणि दोषी आढळल्यास त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी यावेळी संतप्त नातेवाईकांनी केली.

पिकनिकचा प्लान

महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी असल्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. मात्र बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली.

दरवर्षी भाताची लावणी झाल्यानंतर कृषी विद्यापीठातील कर्मचारी पिकनिकला जातात. त्याप्रमाणे हे कर्मचारी शनिवार 28 जुलै 2018 रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास दापोलीहून महाबळेश्वरला जाण्यासाठी निघाले. परंतु साडेदहा वाजता कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळल्याचा फोन आल्याची माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक संजय भावे यांनी दिली.

खोल दरीत बस कोसळल्यामुळे बसचा चेंदामेंदा झाला. इतकंच नाही तर मृतदेहांची अवस्थाही छिन्नविछिन्न झाली.

रेंज आली आणि अपघाचा थरार कळवला

या अपघातातून प्रकाश सावंत देसाई आश्चर्यकारकरित्या बचावले. प्रकाश देसाई हे कसेबसे 800 फूट दरीतून वर आले. वर आल्यानंतर रस्त्यावर त्याच्या मोबाईलला रेंज आली, त्यानंतर त्यांनी सर्वात आधी या अपघाताची माहिती कोकण कृषी विद्यापीठाला कळवली. आमची बस दरीत कोसळली, आम्हाला मदत करा, अशी माहिती प्रकाश सावंत-देसाई यांनी दिली.

संबंधित बातम्या


पोलादपूर बस अपघात : शॉर्टकट ठरला मृत्यूचा मार्ग

पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, 30 जणांचा मृत्यू  


प्रकाश देसाई दरीतून वर आले, रेंज आल्यावर अपघाताची माहिती दिली!  


पोलादपूर बस दुर्घटना : बायकोने थांबवलं म्हणून जीव वाचला, प्रवीण रणदिवेंची पहिली प्रतिक्रिया 


पोलादपूर दुर्घटना: राष्ट्रपती, पंतप्रधान, राहुल गांधींनी व्यक्त केलं दु:ख