Bus Fare Hike : तुम्ही जर दिवाळीला (Diwali 2022) आता ऐनवेळी गावाला जाण्याचा नियोजन करत असाल तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. रेल्वे, एसटीचे बुकिंग फुल्ल झाले आहेत. आता खाजगी बसेस असू द्या किंवा एसटीच्या जादा बसेस....तुम्ही जर गावाला जाण्यासाठी यातून बुकिंग करत असाल तर एसटी बससाठी 10 टक्के तर खाजगी बससाठी जवळपास दुप्पट पैसे तिकीटासाठी मोजावे लागणार आहेत. त्यामुळे दिवाळी सण साजरा करण्यापूर्वीच गावाला जायला तुम्हाला काहीसा खिसा रिकामा करावा लागेल. 


का केली आहे भाडेवाढ? 
दिवाळी सणाला अनेक जण सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचा नियोजन करतात. आता ज्यांनी दिवाळीत ऐनवेळी गावाला जाण्याचे नियोजन केलं आहे त्यांना मात्र प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत आणि ते थोडे थोडके नाही तर जवळपास दुप्पट पैसे जास्त मोजावे लागतील. कारण एकीकडे एसटीने दिवाळीच्या निमित्ताने पंधराशे जादा बसेस सुरु केल्या असल्या तरी यामध्ये हंगामी दहा टक्के भाडे वाढ केली तर दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे खाजगी बसेसने सुद्धा आपले दर मोठ्या प्रमाणावर वाढवले आहेत


अनेक जण नोकरीच्या निमित्ताने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून मुंबईत राहायला आलेले आहेत. त्यामुळे मुखत्वे करुन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ज्यामध्ये मुंबईहून अनेक प्रवासी दिवाळीला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ,कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास करतात, त्यांना नेमके खाजगी बसमधून प्रवास करताना किंवा बुकिंग करताना नेमके किती जादाचे पैसे भरावे लागणार ते पाहूया.


दिवाळीला मुंबईहून मराठवाडा, विदर्भात जाताना खाजगी बसचे भाडे किती? (तारीख 22,23,24 ऑक्टोबर)


मुंबई ते औरंगाबाद  
नियमित दर : 700 ते 900
दिवाळीत वाढवलेले दर : 2000 ते 2400


मुंबई ते नागपूर 
नियमित दर : 2500 ते 2800
दिवाळीत वाढवलेले दर : 3800 ते 4300


मुंबई ते लातूर 
नियमित दर : 1300 ते 1500
दिवाळीत वाढवलले दर : 2500 ते 2700


मुंबई ते कोल्हापूर
नियमित दर : 1000-1100
दिवाळीत वाढवलेले दर : 1900- 2000 पर्यत


मुंबई ते अकोला 
नियमित दर - 1200 ते 1300
दिवाळीत वाढवलेले दर - 2400 ते 2600


मुंबई ते रत्नागिरी 
नियमित दर : 800 ते 900
दिवाळीत वाढवलेले दर : 1700 ते 1800


ऐन दिवाळीत काय आहेत भाडेवाढची कारणं?
आता ऐन दिवाळीतच ही भाडेवाढ का केली जाते? एकीकडे एसटीने दहा टक्के भाडेवाढ केल्याने त्यानुसार खाजगी बसेसनी भाडे वाढ केली आहे. सोबतच खाजगी बसेसचा मेन्टेनन्स, टॅक्स आणि मागील दोन वर्षात कोरोनामुळे झालेला तोटा. शिवाय सरकारकडून कुठलेही अनुदान किंवा मदत मिळत नसल्याने गणेशोत्सव दिवाळी दरम्यान हा तोटा भरुन काढण्याचे काम बस मालकांकडून केलं जात आहे. त्यामुळे सहाजिकच ही भाडेवाढ केली जात असल्याचं बस मालकांचे म्हणणं आहे


रेल्वे बुकिंग फुल्ल, एसटी बसेस फुल्ल आणि आता ऐनवेळी तुम्हाला दिवाळीला गावाला जायचंय. आता यावर तुम्हाला दोनच पर्याय एकतर जादाच्या एसटी बसेस बुकिंग किंवा मग खाजगी बसेस बुकिंग आणि या दोन्हीतूनही तुम्हाला प्रवास करायचा असेल तर जादाचे पैसे दिले शिवाय तुम्हाला पर्याय नाही. त्यामुळे दिवाळीला गावाला जाण्याआधीच तुमचे इथे दिवाळं निघणार हे सध्याचं चित्र आहे.