पंढरपूर : यंदाची वारी कोरोनाच्या सावटाखआली पार पडत आहे. अशातच पायी वारी काढण्यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली असून मानाच्या काही मोजक्याच पालख्यांना मोजक्याच हेलिकॉप्टरद्वारे पंढरपूरात नेण्यात येणार आहेत. आषाढी वारी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच पंढरपूरमध्ये उद्या म्हणजे 30 जून दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू होणार आहे. परंतु, यासगळ्यात वारकऱ्यांकडून एक नवी मागणी होताना दिसत आहे. पंढरपुरातील पारंपरिक वारकरी महाराजांना एकादशी दिवशी नगर प्रदक्षिणेला परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी पाईक संघाने केली आहे.


यंदा कोरोनामुळे आषाढी वारी होत नसून सर्वच वारकरी संप्रदायाने शासनाच्या भूमिकेला साथ दिली आहे. अशातच आता किमान एकादशी दिवशी वारकरी महाराजांना नगर प्रदक्षिणेला संचारबंदीत शिथिलता देण्याची मागणी वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष आणि संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे मानकरी रानमहाराज वासकर यांनी केली आहे. उद्यापासून पंढरपूर शहरात संचारबंदी लागू केली जाणार असून आषाढी एकादशी दिवशी केवळ संतांच्या पादुका घेऊन आलेल्या मानकऱ्यांना नगर प्रदक्षिणेची परवानगी दिली जाणार आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी सोहळ्यातील जवळपास 20 ते 25 महाराज पंढरपुरात असल्याने यांनाही प्रदक्षिणेसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. वारकरी संप्रदायाने तुमचे सर्व ऐकले असताना आता किमान एवढी मागणी तरी मान्य करणारे पत्र या महाराजांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.


पाहा व्हिडीओ : पंढरपुरातील पारंपरिक वारकरी महाराजांना एकादशीला नगर प्रदक्षिणेची परवानगी द्या : वारकरी पाईक संघ 



दरम्यान, शासनाने बाहेरून येणाऱ्या मानाच्या पादुकांना एकादशी दिवशी चंद्रभागा स्नान आणि नगर प्रदक्षिणा करण्याची परवानगी दिली असून 2 जुलै म्हणजेच द्वादशीला मंदिरात दर्शन देऊन त्यांना परत पाठवायचे नियोजन आहे. यालाच वारकरी पाईक संघाने आक्षेप घेतला असून आजवरच्या इतिहासात कधीही पालखी पादुका द्वादशीला पंढरपुरातून बाहेर पडल्या नसल्याने शेकडो वर्षांची परंपरा शासनाने मोडू नये असे आवाहन केले आहे. पादुका शासनाच्या वाहनातूनच येणार असल्याने द्वादशी ऐवजी पौर्णिमेला काला करून परत पाठवाव्यात असे आवाहन रानमाहाराज वासकर यांनी केले आहे.


पंढरपुरात 30 जूनपासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी


पंढरपूरमध्ये उद्या म्हणजे 30 जून दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू होणार आहे. सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली. आषाढी वारी अखेरच्या टप्प्यात आहे. 1 तारखेला आषाढी एकादशी आहे. परंतु कोरोनामुळे कोणालाही पंढरपुरात प्रवेश दिला जात नाही. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संचारबंदीत सर्व अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आल्याचं अतुल झेंडे यांनी सांगितलं. तसंच परवानगी असलेल्या पास धारकांना, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना यांनाही संचारबंदीत सूट असेल, असं ते म्हणाले.


गर्दी न करण्याचं पोलिसांचं आवाहन


आषाढी एकादशीला गर्दी न करता आपापल्या घरातून पंढरपुराचं दर्शन करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे म्हणाले की, "दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपुरात येतात, प्रशासन आपलं स्वागत करण्यासाठी तयार असतं. पण यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती वेगळी आहे. आपण आपल्या घरी राहूनच पांडुरंगाचं दर्शन करावं आणि पंढरपूरला येणं टाळावं."


महत्त्वाच्या बातम्या : 


पंढरपुरात उद्या दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी!


आषाढी एकादशीला विदर्भ, मराठवाड्यातील मोजक्या वारकऱ्यांना पंढरपुरात येऊ देण्याच्या मागणीसाठी नागपुरात आंदोलन


पंढपुरात प्रदक्षिणामार्गावर कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ! परिक्रमेत अडचण नसल्याचा प्रशासनाचा खुलासा