नागपूर : आषाढी एकादशी दोन दिवसांवर आली आहे. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी राज्यचं नाही तर प्ररप्रांतातूनही वारकरी दिडींत चालत पंढरपूरला या दिवशी पोहचत असतात. मात्र, यंदा या सोहळ्यावर कोरोना संसर्गाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवडक वारकऱ्यांनाच पंढपुरात येण्यासाठी परवानगी दिली आहे. मराठवाडा, विदर्भातूनही लाखो वारकरी पायी चालत पंढरपुरात पोहचत असतात. मात्र, यंदा प्रशासनाने परवानगी नाकाराल्याने निदान जुन्या दिडींतील निवडक 500 वारकऱ्यांना आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये येण्यास परवानगी द्यावी, त्यासाठी विशेष रेल्वेची सोय करावी या मागणीसाठी नागपुरात वारकऱ्यांनी आंदोलन केलं.
राज्याचं सरकार कसलं धर्मनिरपेक्ष सरकार आहे. या सरकारला बुद्धी आहे की नाही असे प्रश्न विचारत लोकजागृती मोर्चा आणि लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने नागपुरात टाळ मृदंग वाजवत आंदोलन केले. या आंदोलनात यज्ञ करत राज्य सरकारला बुद्धी यावी आणि प्रातिनिधिक स्वरुपात काही वारकऱ्यांना रेल्वेने पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी यज्ञ ही करण्यात आले. विदर्भ आणि मराठवाड्यातून किमान 5 लाख वारकरी विविध पालख्यांसह पंढरपूरला जातात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीची अनुमती नसली तरी काही जुन्या पालख्यांना निवडक वारकऱ्यांसह पंढरपूरला जाऊ द्यावे. त्यासाठी पालखी स्पेशल ट्रेन चालवावी, अशी मागणी लोकजागृती मोर्चा आणि लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने राज्य सरकारकडे केली होती. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयांना पत्रंही पाठवण्यात आली होती.
पंढपुरात प्रदक्षिणामार्गावर कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ! परिक्रमेत अडचण नसल्याचा प्रशासनाचा खुलासा
वारकऱ्यांचा प्रशासनावर आरोप
मात्र, आंदोलन करणाऱ्या वारकऱ्यांचा आरोप आहे की मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासनिक अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांची मागणी पर्यटनाची मागणी असून कोरोना संकट काळात पर्यटनासाठी परवानगी देता येणार नाही. नेमकं याच मुद्द्यावरून विदर्भातील वारकरी चिडले असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे की नाही असा प्रश्न विचारत त्यांनी नागपुरच्या रेशीमबाग परिसरात टाळ मृदंग वाजवत सरकार विरोधात आंदोलन केले. विठ्ठला या सरकारला सद्बुद्धी दे अशी मागणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्र्यांशी बोलून विशेष श्रमिक एक्स्प्रेसच्या धर्तीवर पालखी एक्स्प्रेस चालवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.
पंढपुरात प्रदक्षिणामार्गावर कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ
आषाढी यात्रा दोन दिवसांवर आली असताना आज सकाळी प्रदक्षिणामार्गावर एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, असे असले तरी एकादशीच्या दिवशी पादुकांच्या नगर प्रदक्षिणेला कोणतीही अडचण येणार नसल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. यंदा कोरोनाच्या संकटामुळे आषाढी यात्रा भरणार नसली तरी मानाच्या संत पादुका मात्र येणार आहेत. एकादशी दिवशी चंद्रभागेचे स्नान करुन मंदिराची नगरप्रदक्षिणा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. आज सकाळी नेमके प्रदक्षिणामार्गावर मार्गावर एक कोरोना रुग्ण आढळल्याने वरिष्ठ स्तरावर विचारविनिमय केल्यानंतर प्रदक्षिणेला अडचण नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
Coronavrius | पंढरपुरात प्रदक्षिणा मार्ग परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला