पंढरपूर : पंढरपूरमध्ये उद्या म्हणजे 30 जून दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू होणार आहे. सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली. आषाढी वारी अखेरच्या टप्प्यात आहे. 1 तारखेला आषाढी एकादशी आहे. परंतु कोरोनामुळे कोणालाही पंढरपुरात प्रवेश दिला जात नाही. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


"आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीच्या माध्यमातून दरवर्षी 12 ते 15 लाख वारकरी पंढरपुरात येतात. परंतु यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर ठरवून दिलेल्या मानाच्या पालख्यांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. नाकाबंदीही केलेली आहे. गर्दी होऊ नये यासाठी 29 जून ते 2 जुलैपर्यंत संचारबंदीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु व्यापारी आणि लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करुन 30 जून रोजी दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदीचा नवीन प्रस्ताव मान्य केला आहे," अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.



संचारबंदीत कोणाकोणाला सूट?
या संचारबंदीत सर्व अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आल्याचं अतुल झेंडे यांनी सांगितलं. तसंच परवानगी असलेल्या पास धारकांना, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना यांनाही संचारबंदीत सूट असेल, असं ते म्हणाले.


कडेकोट बंदोबस्त
"मंदिर प्रदक्षिणा किंवा नगर प्रदक्षिणासाठी पासधारकांशिवाय कोणालाही प्रवेश देणार नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून बॅरिकेटिंग केलं आहे. याशिवाय शहरात 1200 पोलीस कर्मचारी आणि 800 होमगार्डचा बंदोबस्त ठेवला आहे," असं अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितलं..



पोलिसांचं आवाहन
आषाढी एकादशीला गर्दी न करता आपापल्या घरातून पंढरपुराचं दर्शन करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे म्हणाले की, "दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपुरात येतात, प्रशासन आपलं स्वागत करण्यासाठी तयार असतं. पण यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती वेगळी आहे. आपण आपल्या घरी राहूनच पांडुरंगाचं दर्शन करावं आणि पंढरपूरला येणं टाळावं."


यासोबत अतुल झेंडे यांनी सर्व भक्तांचे, वारकऱ्यांचे चांगल्या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले. "आता फक्त आषाढी एकादशीचा एकच दिवस आहे, ज्या दिवशी 100 टक्के सहकार्याची अपेक्षा आहे," असं ते म्हणाले.