मुंबई : सध्या एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे अशा मंडळींची अस्वस्थ तगमग, तळमळ सुरूच आहे. त्या तगमगीतून एखाद्या नव्या भूकंपाची वात पेटू नये म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, असा टोला सामनातून शिवसेनेनं भाजपला लगावला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्वत:च्या पायावर मजबुतीने आत्मनिर्भर झाले आहे. त्याच आत्मनिर्भरतेचा मार्ग विरोधी पक्षाने स्वीकारला तर राज्यातील कोरोनाविरोधी लढाईस बळ मिळेल, असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

कोरोनाच्या संकटानंतर राज्यात आणि देशात काँग्रेसमध्ये मोठे राजकीय भूकंप होतील असं भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हटले होते. यावरून आता शिवसेनेनं त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारणात अनेकदा पेच निर्माण होतात. मात्र सध्या कोरोनाचा विषाणू जग पोखरत आहे. अशावेळी राजकारणाचा विषाणू विरोधकांच्या डोक्यात वळवळावा हे बरं नाही, शेवटी मोदी-शाह यांनाच लस टोचून विषाणूचा बंदोबस्त करावा लागला, अशा शब्दात सामनातून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा- कोरोना संकट संपल्यानंतर देशासह महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे भूकंप : चंद्रकांत पाटील

सरकारचे काही चुकत असेल तर प्रश्न विचारायचा पूर्ण अधिकार विरोधकांना आहे. 105 चा भक्कम आकडा असतानाही त्यांना सत्ता राखता आली नाही. त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तरी त्यांच्याही मनाची अशीच तळमळ व शरीराची लाहीलाही झाली असती, असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांवर टीका केली आहे.

... त्यावेळी खडसेंनी खंजीर खुपसला नाही का?, एकनाथ खडसेंच्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांचं उत्तर

VIDEO | काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील


विरोधकांनी अनेक अडथळे व अडचणी निर्माण केल्या तरीही उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे सरकार अडचणीत आणण्यासाठी राजकीय दाबदबावाचे जंतरमंतर करू पाहणारेच परागंदा झाले आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदास कोणताही धोका नाही (तसा तो कधीच नव्हता) आणि राज्यातील महाविकास आघाडीसही इजा पोहोचणार नाही. विरोधकांचे सगळे अघोरी प्रयोग त्यांच्यावरच उलटले आहेत, असं देखील सामनात म्हटलं आहे.

भाजपने तिकीट नाकारल्यानंतर सहाव्या जागेसाठी काँग्रेसची ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

'पाटलांनी सरकार पाडण्यासाठी कामास लागावे'
‘महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात लवकरच भूकंप होईल. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल.’ चंद्रकांतदादा अशी काही उलथापालथ घडवू पाहत असतील तर तो त्यांचा राजकीय हक्क आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एखादा लंगोट कसून मैदानात उतरायचा प्रयत्न जरूर करून पहावा. पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकार बनविण्याचा प्रयोग फसला. आता काँग्रेसमध्ये भूकंप घडवून महाराष्ट्रात उलथापालथ करायची असेल तर त्यांना कोण रोखणार? सर्व स्थिरस्थावर झाले की, पाटलांनी सरकार पाडण्यासाठी करवत, हातोडे, विळे, कोयते वगैरे घेऊन कामास लागावे, असा टोलाही लगावला आहे.

'...तोच खिळा आज सरकारला मजबुती देतोय'
पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्र विकास आघाडीतला अजित पवारांचा खिळा या मंडळींनी काढला, पण तोच खिळा आज सरकारला मजबुती देत आहे. विरोधक ठाकरे सरकार खिळखिळे करण्याचा जेवढा प्रयत्न करतील तेवढे हे सरकार मजबूत आणि गतिमान होईल. सरकारचे काही चुकत असेल तर प्रश्न विचारायचा पूर्ण अधिकार विरोधकांना आहे. 105 चा भक्कम आकडा असतानाही त्यांना सत्ता राखता आली नाही. त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तरी त्यांच्याही मनाची अशीच तळमळ व शरीराची लाहीलाही झाली असती. सध्या खडसे, पंकजा, बावनकुळे, तावडे अशा मंडळींचीही अस्वस्थ तगमग, तळमळ सुरूच आहे. त्या तगमगीतून एखाद्या नव्या भूकंपाची वात पेटू नये म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे. महाविकास आघाडीचे सरकार स्वत:च्या पायावर मजबुतीने आत्मनिर्भर झाले आहे. त्याच आत्मनिर्भरतेचा मार्ग विरोधी पक्षाने स्वीकारला तर राज्यातील कोरोनाविरोधी लढाईस बळ मिळेल, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

हे ही वाचा- भाजपमधील खदखद समोर येतेय का? नाथाभाऊ, पंकजाताई व्हाया राम शिंदे! 

EXCLUSIVE Eknath Khadse | विधानपरिषदेसाठी भाजपनं तिकीट न दिल्यानं खंजीर खुपसल्याची भावना - एकनाथ खडसे