जळगाव : विधानपरिषदेसाठी भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने सहाव्या जागेसाठी ऑफर देण्यात आली होती. त्यासाठी भाजपच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटींग करण्याचं मान्य केलं होतं. मात्र काँग्रेसकडून उभं राहण्यास आपण नकार दिला असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज केला आहे.


विधानपरिषदेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळावी, अशी त्यांना इच्छा होती.  विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांनी भाजप पक्ष श्रेष्ठींकडे मागणीही केली होती. मात्र 42 वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानंतरही त्यांना तिकिटाची संधी न मिळाल्याने खडसे यांनी आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं की, विधानपरिषदेसाठी माझ्यासह काही ज्येष्ठ नेत्यांना पक्षाने विधानपरिषदेला तिकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी आमच्या नावाची शिफारस पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.


मात्र ऐनवेळी निवडणूक निवड समितीने शिफारस नसलेली नावं पाठवून एक प्रकारे आम्हाला दगा फटका केला असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. आम्हाला तिकीट मिळालं नाही याचं दुःख नाही. मात्र ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलंय त्यांना आयत्या वेळी तिकीट देण्यात आल्याने अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.


सध्या कोरोनाच्या संकटातून जात आहोत, यावेळी कोणताही राजकीय निर्णय करण्याऐवजी कोरोनाचा संकट निवळल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय आपण करू, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.