अहमदनगर: एबीपी न्यूजच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराला पोलिसांनी जेरबंद केलं . अजीज बाबू इनामदार असं या भामट्याचं नाव आहे.
या भामट्याने लॉरेन्स स्वामी या व्यावसायिकाकडं 25 लाखाची खंडणी मागितली होती. आरोपीकडून दहा हजारांच्या मुद्देमालासह एबीपी न्यूजच्या बनावट चॅनल आयडी आणि बूम जप्त करण्यात आला आहे.
तसंच एबीपी न्यूजच्या नावाची बॅग आणि एबीपी न्यूजचं बनावट ओळखपत्र जप्त केलं आहे. त्याचबरोबर दैनिकाचे दोन बनावट ओळखपत्र जप्त केले आहेत.
कारवाईवेळी भामट्याने कांगावा करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकार आणि पोलीसांनी त्याला शिताफीनं पकडलं. पोलिसांशी झटापट करुन पळताना काही नागरिकांनी त्याला चोपही दिला आहे.
या प्रकरणीइनामदारवर खंडणी, फसवणूक आणि तोतयागिरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या खंडणीच्या कटात अजून कोण कोण सहभागी आहे आणि ओळखपत्र, चॅनल आयडी कुठं बनवले, याबाबतचा तपास कॅम्प पोलीस करत आहेत.
अजीज इनामदार या भामट्यानं व्यावसायिक लॉरेन्स स्वामीकडं पंचवीस लाखाची खंडणी मागितली होती. माहितीच्या अधिकारात स्वामी यांच्या कामांची आणि मालमत्तेची माहिती घेतली होती. या संदर्भात गेल्या तीन दिवसांपासून भामट्यानं स्वामींशी संपर्क साधत होता. तुमच्या अवैध संपत्तीची ईडीकडून चौकशी करु अशी धमकी देत होता.
खंडणीसाठी सुरुवातीला भामट्यांनं स्वामींशी फोनवरुन संपर्क साधला. शहरातील हॉटेलमध्ये पंचवीस लाखाची मागणी केली. त्यानंतर वारंवार जागा बदलत तडजोड करुन पंधरा लाखाची मागणी केली. त्यावेळी दुकानासमोर पैशाची बॅग स्विकारताना पोलीसांनी झडप टाकून त्याला जेरबंद केलं.