ज्ञानेश्वर पिसे असे या भामट्याचे नाव असून तो या जॅकेटच्या सहाय्याने दारुची तस्करी करत होता. जॅकेटच्या 24 खिशांमध्ये 24 दारुच्या बाटल्या घेऊन तो यवतमाळमधून वर्ध्यात विक्री करत होता. पिसे आज कळंबवरुन राळेगावला बसने आला होता. त्यावेळी राळेगाव बस स्थानकावरील पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले.
या दारूच्या तस्करीला कोणाचे अभय आहे, पिसेसाऱख्या तस्करांच्या म्होरक्याला पोलीस कधी पकडणार? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. या विशिष्ट जॅकेटचा वापर करुन पिसे गेल्या अनेक दिवसांपासून दारुची तस्करी करत असल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जॅकेट वापरुन अजून किती जण दारुची तस्करी करत आहेत, असा सवालही लोकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तसेच आसपासच्या काही गावांमधील दारु तस्कर काम करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
