Akshaya Tritiya 2021 आज अक्षय्य तृतीया. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असणारा असा हा दिवस. हिंदू पंचांगामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. वैशाख महिन्यात येणारी शूक्ल पक्षाची तृतीय तिथी या दिवशी साजरी केली जाते. अनेक शुभकार्यांसाठी या दिवसाला प्राधान्य देण्यात येतं. या दिवशी सर्वत्र मंगलमय वातावरणाची अनुभूती होते. 


विवाह, धार्मिक कार्य, नवं वाहन, घर, दागिने खरेदी यांसारखी शुभकामं या दिवशी केली जातात. विष्णू आणि लक्ष्मी देवीची या दिवशी पूजा केली जाते. विष्णुचाच अवतार असणाऱ्या भगवान परशुराम यांचा प्रकट दिनही याच दिवशी असल्याचं मानण्यात येतं. 


अक्षय्य तृतीयेची मुहूर्तवेळ 


यंदाच्या वर्षी वैशाख शुक्ल तृतीया तिथी पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी सुरु झाली असून, 15 मे रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत या दिवसाची मुहूर्तवेळ आहे. पुजेसाठी पहाटे 5 वाजून 40 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 20 मिनिटांपर्यंतचा मुहूर्त आहे. 


PHOTO : विठ्ठल आवडी प्रेमभाव... अक्षय्य तृतीयेनिमित्त विठुमाऊलीच्या गाभाऱ्याला आमराईचं रुप


अक्षय्य म्हणजे कधीही न नष्ट होणारे, न संपणारे. अक्षय्य तृतीयेच्या या दिवशी दान करण्यालाही अतिशय महत्त्वं आहे. या दिवशी दान केल्यामुळं कधीही न नष्ट होणारं, न संपणारं पुण्य प्राप्त होतं. शिवाय पितरांचे आशीर्वादही मिळतात. 


शुभकार्यांसोबतच या दिवशी सोनं खरेदीलाही अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. सहसा या दिवशी सराफा बाजारात चांगलीच गर्दी पाहायला मिळते. पण, यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाचं संकट असल्यामुळे याचे थेट परिणाम सोनं खरेदी आणि सराफा व्यवसायावरही होणार आहेत. असं असतानाही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत यंदाच्या अक्षय्य तृतीयेला आरोग्याला प्राधान्य देण्यात येत आहे. किंबहुना अनेक यंत्रणांकडून तसं आवाहन करत अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.