Nanded News:  नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील अक्षय श्रावण भालेराव याची हत्या ही जातीय श्रेष्ठत्वाच्या अहंकारातून झाली असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. नांदेड शहराजवळील बोंडार हवेली या गावात डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून काही सवर्णांनी अक्षय श्रावण भालेराव या तरूणाची निर्घृण हत्या केली होती. 


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीच्यावतीने भालेराव कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. बोंडार हवेली गावातील भूमिहीन श्रावण भालेराव हे स्वतः आणि त्यांची मुले मोलमजुरीवर गुजराण करतात. यावेळी पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी भालेराव कुटुंबियांची भेट घेत सात्वंन केले. दिवंगत अक्षयच्या आई वंदनाबाई यांच्या हाती एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. त्यावेळी त्यांच्या सोबत पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य कॉ. विजय गाभणे, नांदेड शहर सचिव गंगाधर गायकवाड, नांदेड जिल्हा समिती सदस्य कॉ. उज्ज्वला पडलवार, पक्षाचे लातूर जिल्हा सचिव सुधाकर शिंदे, किसान सभेच्या राज्य कौन्सिलचे सदस्य संजय मोरे आदी उपस्थित होते. 


या गावात एका सवर्णांच्या लग्नाच्या वरातीत तरूण हातात नंग्या तलवारी घेऊन नाचत होते.  त्याच वेळी गावातील दुकानात घरगुती सामान  खरेदी करण्यास आलेला अक्षय आणि त्याचा भाऊ आकाश त्या तरूणांच्या नजरेला पडले. त्या तरूणांनी या दोन भावांवर हल्ला केला. त्यात अक्षय ठार झाला आणि आकाशच्या हाताला खोल जखम झाली. अक्षयने गावात डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात पुढाकार घेतला होता. त्या रागातून काही सवर्ण तरूणांनी तलवारी, जंबिये आदी शस्त्रांनी अक्षयची हत्या केली. डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्याच्या बाबतीत तेथील पोलीस खात्याची आणि प्रशासनाची काय भूमिका होती, हेही तपासून पाहिले पाहिजे अशी मागणीदेखील माकपने केली आहे.


या प्रकरणी अक्षयचा भाऊ आकाश याने दाखल केलेल्या तक्रारीवरून या हत्येमागे केवळ वरिष्ठ जातीय अहंकार असल्याचे दिसून येत असल्याचे डॉ. नारकर यांनी म्हटले.  मृत अक्षय आणि त्याचे कुटुंबिय अनुसूचित जातीमधील असून मोलमजुरी करून गुजराण करतात. या वस्तुस्थितीवरून त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांचा जीव घेणे हा आपला हक्कच असल्याची अजूनही तथाकथित वरिष्ठ मालमत्ताधार जातीयांमध्ये भावना आहे. भारतीय संविधानाला हे अजिबात मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले.  या गुन्हेगारी कृत्यामुळे बोंडार हवेली गावातील सामाजिक वातावरण दूषित होऊ शकते. त्यातून आणखी अनर्थ होऊ नये यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. गावातील सर्व जातींमधील जनतेला सोबत घेत गावात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, अशी मागणीदेखील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.